महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

पिंजर्‍यातील चंद्रकला... काळाच्या पडद्याआड.

पिंजर्‍यातील चंद्रकला... काळाच्या पडद्याआड.
October 05, 2025 09:36 PM ago Baramati, Maharashtra, India

मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरलेल्या पिंजरा या गाजलेल्या चित्रपटाची नायिका नृत्यांगणा चंद्रकला ऊर्फ ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांनी वयाच्या 94 वर्षी या जगाचा निरोप घेतला आणि मराठी रसिकांच्या मनावर कधीकाळी अधिराज्य गाजविणारी नायिका काळाच्या पडद्याआड गेली.

ज्येष्ठ निर्माते, दिग्दर्शक व्ही.शांताराम बापू यांनी ज्या काही कलाकृती निर्माण केल्या. त्यात पिंजरा या सिनेमाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.

सन 1972 मध्ये निर्माण झालेला हा सिनेमा आजही मराठी रसिकांच्या मनात कायमचा घर करुन राहिलेला आहे.यामधील कलावंत श्रीधर मास्तर: श्रीराम लागू, चंद्रकला ढवळीकर - अभिनेत्री संध्या यांच्यासह जे मान्यवर कलावंत यामध्ये सहभागी झालेले होते.त्यांनी आपल्या सरस अभिनयाने या कलाकृतीला अजरामर करुन टाकले.आज 53 वर्ष पूर्ण झाली.या पन्नास वर्षाच्या कालखंडात या सिनेमाचे मराठी प्रेक्षकांवरील गारुड तसूभरही कमी झालेले नाही.उलट आजच्या पिढीलाहा या सिनेमाची भुरळ पडली असल्याचे दिसून येते.इतकी अप्रतिम कलाकृती बापूंनी बनविली.अर्थात यामागे अनेक दिग्गजांचा सहभाग आहे.श्रीराम लागूंचा नायक म्हणून केलेला हा पहिलाच सिनेमा.एक ध्येयवादी शिक्षकाची ही कथा.गावासाठी झटणारा,शिक्षणप्रेमी असे हे श्रीधर मास्तर.गावात तमाशा येऊ नये म्हणून तमाशावाल्यांना हाकलून लावणारा एक समाजसुधारक.पण त्याच समाजसुधारकाला आपल्या सौंदर्य,प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी नृत्यांगणा चंद्रकला..हे सारी कथाच मनाला शेवटपर्यंत गुंतवूण ठेवणारी आहे. या सिनेमातील राम कदम यांचे अजरामर संगीत,जगदीश खेबूडकर यांच्या गाजलेल्या लावण्या यामुळे या सिनेमाची उंची वाढली.ज्वानीच्या आगीची मशाल हाती, छबीदार छबी मी तोर्‍यात उभी, तुम्हावर केली मी मर्जी बहाल,नका सोडून जाऊ रंगमहाल, देरे कान्हा चोळी अन लुगडी अशी गाणी प्रचंड अजरामर झाली. या सर्व गाण्यांमध्ये बेभान नृत्य करणारी चंद्रकला अर्थात अभिनेत्री संध्या यांनी जीव ओतून काम केले.त्यामुळे त्या रसिकांच्या मनात कायमच घर करुन राहिल्या.त्यानंतर त्यांनी अनेक मराठी,हिंदी चित्रपटातून काम केले.पण पिंजरामधील संध्याच मराठी प्रेक्षकांच्या मनात कायमची घर करुन राहिली. चंदनाची चोळी या सिनेमातही संध्या यांची भूमिका खूपच गाजली. संध्या यांचे सर्वच मराठी,हिंदी सिनेमे रसिकांसाठी एक मेजवाणीच ठरलेत.त्यामुळे अजूनही ज्या ज्यावेळी हे सिनेमे विविध चॅनेल्सवर लागतात त्यावेळी अस्सल मराठी रसिक ते पाहण्याचा आनंद लुटतोच.

बापूंनी ज्या काही अजरामर कलाकृती निर्माण केल्या.त्यात संध्या यांच्या भूमिका मराठी प्रेक्षकांना निश्‍चितच पसंत पडल्या.आज त्यांचे निधन झाले.लौकिकार्थाने त्यांनी या जगाचा निरोप घेतला खरा,पण त्यांच्या अजरामर भूमिकांनी त्या रसिकांच्या मनात आजन्म वास करुन राहिल्यात हे नक्की.अभिनेत्री संध्या यांना विनम्र अभिवादन.


सतिश साबळे

अध्यक्ष:महाराष्ट्र सोशल मिडिया महाराष्ट्र राज्य

संबधित बातम्या