हैद्राबाद–मुंबई (हुसेनसागर एक्सप्रेस) पारेवाडी स्टेशनवर थांबा द्यावा - अॅड. अजित विघ्ने.
पारेवाडी | प्रतिनिधी
हैद्राबाद–मुंबई (हुसेनसागर एक्सप्रेस) गाडीचा थांबा पारेवाडी रेल्वे स्थानकावर द्यावा, अशी नागरिकांची दीर्घकाळची मागणी आता अधिक तीव्र झाली आहे. सकाळी ६:४५ च्या सुमारास ही गाडी पारेवाडी स्टेशनजवळून जात असली तरी नियमित थांबा नसल्याने पारेवाडी व केत्तुर परिसरातील प्रवाशांना ३०–३५ किमी बायरोड प्रवास करावा लागतो.
या प्रश्नावर अॅड. अजित विघ्ने हे नागरिकांच्या आघाडीवर काम करत असून त्यांनी सातत्याने या मागणीसाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत. स्थानिक नागरिकांबरोबरच विविध सामाजिक संघटनांशी समन्वय साधत त्यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहेत.
याआधी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हरंगुळ व कलबुर्गी येथे गाड्यांचे थांबे मिळाले. त्या थांब्यांमुळे रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे पारेवाडीवर हुसेनसागर एक्सप्रेस थांबल्यास पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि रेल्वेलाही आर्थिक फायदा होईल, असा नागरिकांचा विश्वास आहे.
सन १९९६ पासून मोर्चे, उपोषणे, रेल रोको अशा अनेक आंदोलनांनंतरही ठोस निर्णय न झाल्याने नागरिक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून रेल्वे मंत्रालयावर दबाव आणत आहेत. "हैद्राबाद–मुंबई गाडी पारेवाडीवर थांबलीच पाहिजे!" या घोषणेला आता अॅड. अजित विघ्ने यांचे नेतृत्व लाभल्याने ही चळवळ अधिक जोम धरताना दिसते.
