एक वर्ष… विश्वासाचं, सेवाभावाचं आणि जबाबदारीचं दत्तामामा भरणे
महाराष्ट्र सोशल मीडिया ; मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारून आज एक वर्ष पूर्ण झालं. हा एक वर्षांचा प्रवास माझ्यासाठी पदाचा नाही, तर जनतेनं दिलेल्या अमूल्य विश्वासाचा आहे.
या एका वर्षात आनंदाचे, अपेक्षांचे, वेदनांचे आणि आशेचे अनेक चेहरे पाहिले. प्रत्येक चेहरा मला अधिक जबाबदार बनवत गेला. तुमच्या प्रश्नांसाठी, तुमच्या हक्कांसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी काम करताना प्रत्येक क्षण अर्थपूर्ण वाटला.
या संधीसाठी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, पक्षाचे मार्गदर्शक नेते, निष्ठावंत कार्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी आणि माझ्या सर्व स्टाफ यांचाही आभारी आहे.
शिवाय, माझ्या जनतेचे विशेष आभार…
तुमचा विश्वास, तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद, हाच माझा खरा आधार आहे. तुमच्या पाठबळामुळेच कठीण निर्णय घेण्याची हिंमत मला मिळाली.
या एका वर्षात क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विभाग तसेच कृषी विभागाचा मंत्री म्हणून काम करण्यास संधी मिळाली. या तिन्ही विभागाचा मंत्री म्हणून काम करताना अनेक प्रश्न मार्गी लावले, काही अजून मार्गावर आहेत. काही ठिकाणी तुमचं समाधान झालं नसेल, तर त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण तुमच्यासाठी काम करण्याची जिद्द, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव कधीही कमी होणार नाही, याची ग्वाही देतो.
एक वर्ष पूर्ण झालं असलं, तरी ही या कमी कार्यकाळात खुप काही केलं आहे.
अतिवृष्टीमध्ये रात्री-दिवस काम केलं, शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांची ग्रा-हाणी ऐकली, त्यांच्या व्यथा, वेदना ऐकल्या. शेतक-यांचा प्रतिनिधी म्हणून त्या शासन दरबारी पोहचविल्या. आज रोजीपर्यंत २० हजार कोटींहून अधिक रक्कम शेतक-यांना मदत म्हणून मिळाली आहे. तसेच ३० जुनच्या आधी शेतक-यांची कर्जमाफी होणार आहे. या दोन गोष्टी माझ्यासाठी या वर्षातील अतिशय महत्वाच्या अचिव्हमेंट आहेत.
तुमच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी पुढेही अखंड प्रयत्न करत राहीन.
या सेवापर्वात माझ्यासोबत उभ्या राहिलेल्या प्रत्येकाचे मनापासून आभार.
