प्रेम मिळवण्यात रुबाब नाही, तर ते जपण्यात रुबाब आहे. सतीश(भाऊ)साबळे
रुबाब -खरंच, ही अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे, हे चित्रपट पाहिल्यावर जाणवतं
रुबाब खरंच, ही अख्ख्या जगाची लव्ह स्टोरी आहे, हे चित्रपट पाहिल्यावर जाणवतं.
प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी कुणाच्या तरी प्रेमात पडतो. पण प्रेम प्रत्येकालाच मिळतं असं नाही. याचा अर्थ असा नाही की आपण प्रेमात अपयशी ठरलो किंवा आपल्यात काहीतरी कमी आहे. मात्र असा गैरसमज करून कित्येक मुलं स्वतःचं आयुष्य उध्वस्त करून घेतात. ‘रुबाब’ हा चित्रपट याच गर्तेतून बाहेर पडण्याचा—त्याग आणि स्वीकाराचा—मार्ग दाखवतो.
रुबाब म्हणजे सूरजचा स्प्लेंडर ते बुलेटपर्यंतचा प्रवास.
एका भरकटलेल्या मुलाच्या आयुष्यात जेव्हा वैशालीसारखी मुलगी येते, तेव्हा रुबाब घडतो. त्या वयातील हार्मोनल बदलांमुळे तिला सूरजच्या दारूचा वाससुद्धा सुगंधासारखा वाटतो—म्हणजे प्रेमात आकंठ बुडणं!
दिग्दर्शकाने केवळ सूरज–वैशाली यांचाच दृष्टिकोन दाखवलेला नाही; सूरजच्या वडिलांचा तो संवाद फार महत्त्वाचा आहे.
“तू तुझ्या बहिणीचं लग्न तुझ्यासारख्या व्यसनी मुलाशी लावशील का?”
या प्रश्नावर सूरजचे (संभाजी ससाणे) हावभावच खूप काही सांगून जातात.
संवाद, गोष्ट सांगण्याची शैली इतकी एकरेषीय आहे की आपण सहज चित्रपटाशी एकरूप होतो.
वैशाली विष घेऊन त्या पडक्या घरात आत्महत्या करायला येते आणि सूरजची ex GF माधुरी तिचा पाठलाग करून तिला समजावते—तो प्रसंग अतिशय प्रभावी आहे. ते पडके घर म्हणजे व्यसनाधीन सूरज; त्यात भूतकाळ (माधुरी) आणि वर्तमान (वैशाली) त्याच्या भविष्यासाठी रडत आहेत. या क्षणी अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो.
भूषण मंजुळे यांची ती “दीड मिनिटांची भेट” आणि त्या भेटीमुळे सूरजच्या मनात पेटलेली सूडाची आग शांत होते—हा क्षण फार बोलका आहे.
आज 5G च्या काळातही महिलांवर होणाऱ्या घरगुती हिंसेवर दिग्दर्शकाने अतिशय संयमित पद्धतीने प्रकाश टाकला आहे.
पार्श्वसंगीत प्रभावी आहे, गाणी कथेशी पूर्णपणे सुसंगत आहेत.
प्रेम एकाशी आणि लग्न दुसऱ्याशी करून संसार थाटणं किती कठीण असतं, हे वास्तववादी पद्धतीने दाखवलं आहे—आणि दुर्दैवाने आज समाजात अनेक मुली याची शिकार आहेत.
शेखर सरांनी शेवट अगदी त्यांच्या शैलीत केला आहे—वास्तववादी, हृदय पिळवटून टाकणारा, पण तरीही सकारात्मक.
विशाल आणि अभिजित यांनी उत्तम काम केलं आहे. संभाजी आणि शीतल यांनी तर अक्षरशः जीव ओतला आहे.
रुबाब टीमने खूप मेहनतीने हा चित्रपट बनवला आहे, हे प्रत्येक फ्रेममध्ये जाणवतं.
एक क्षणही कंटाळा येत नाही—चित्रपट हसवतो, रडवतो आणि शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवतो.
माझ्या ५ वर्षांच्या मुलीनेही पूर्ण चित्रपट संपेपर्यंत खुर्ची सोडली नाही, हे विशेष!
हा चित्रपट थिएटर एक्स्पेरियन्ससाठीच बनवलेला आहे.
सहपरिवार पाहायला हरकत नाही.
शुभेच्छा टीम रुबाब!
प्रेम मिळवण्यात रुबाब नाही, तर ते जपण्यात रुबाब आहे.
