हम ना समझे थे .. गर्दिश १९९३ हिंदी चित्रपट. सतिश(भाऊ)साबळे
जॅकी, अमरीश पुरी अन मुख्यतः दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा. गर्दिश.
महाराष्ट्र सोशल मिडिया ; गर्दिश १९९३ साली आला होता
जॅकी, अमरीश पुरी अन मुख्यतः दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा.
एक वर्ष आधीचा प्रियदर्शनचा 'मुस्कुराहट' आवडलेला.
त्यामुळे गर्दीश पहिल्याच दिवशी पहायला गेलो होतो.
पोलीस कॉन्स्टेबल बाप पुरषोत्तम साठे (अमरीश पुरी) हा मुंबईत पोलीस दलात काम करणारा प्रामाणीक माणूस. बायको लक्ष्मी (फरीदा जलाल) व मुलगा शिवा (जॅकी) यांच्यावर नितांत प्रेम करणारा एक मध्यमवर्गीय माणूस. आपल्या मुलाने शिवाने पोलीस इन्स्पेक्टर व्हावं ही त्यांची इच्छा असते. त्यासाठी मुलाला च़ागल्या शिक्षणासोबत त्याच्या शारिरीक व्यायामावर देखील त्यांचं कटाक्षाने लक्ष आहे. शिवा व्यायामाचा कंटाळा करत असला तरी त्याला समुद्रावर नेउन धावायला लावणे, जरुरी व्यायाम करुन घेणे
हे काम ते करत असतात. मुलगा व बापातलं बॉंडी़ग अमरीश पुरी अन जॅकी श्रॉफ या दोघांनी सिनेमात खूपच छान दाखवलं आहे. एकदम छान हसरं सुखी कुटुंब असतं हे.
पण मग या सुखाला नजर लागते. अशा काही घटना घडतात की सारंच बिघडून जातं. पुरषोत्तम ड्युटीवर असताना एक सराइत दादा बिल्ला जिलानीशी (मुकेश ऋषी चा पहिला सिनेमा) त्यांचा सामना होतो. बिल्ला व त्याचे गुंड पुरषोत्तमला व इतर गरीब लोकांवर हल्ला करतात, त्यांना मारहाण करत असतात तेंव्हा इंटरव्यूह ला तिथूनच जाणारा शिवा ते पाहतो. आपल्या वडीलांना होणारी मारहाण सहन न होउन पेटून उठलेला शिवा मग जे तांडव दाखवतो त्यात बिल्ला व त्याचे गुंड प्रचंड मार खातात व तिथल्या बस्तीतले लोक शिवाला दादा मानू लागतात.
आपल्या डोळ्यासमोर हे सारं घडताना पाहून पुरषोत्तम चक्रावतात. मी मुलाला कायदाचा रक्षक बनवायला निघालोय अन हा मुलगा कायदाच हातात घेतोय हे पाहून ते चिडतात. शिवाला पोलीस पकडून नेतात. शिवा पकडला जाउ नये, त्याला तुरुंगवास होउ नये म्हणून ते आपला स्वाभिमान बाजूला ठेउन आपल्या साहेब लोकांशी रदबदली करतात. शिवाने उचललेले हिंसेचे पाउल त्यांना पसंत नसलं तरी आपला मुलगा निर्दोष आहे हे त्यांना मनोमन ठाउक असतं.
शिवा तुरुंगातून बाहेर येतो पण आता तो नोकरीच्या मागे न लागता पूर्णपणे गुंडगिरी, हफ्ता घेणे ही काम करु लागतो. पुरषोत्तमना हे कळताच ते शिवाला घराबाहेर काढतात. ज्या मुलाला इन्स्पेक्टर बनवण्याचं स्वप्न पाहिलं त्याला स्वतःच्या हातांनी जेलमधे बंद करायची वेळ त्यांच्यावर येते. एक मध्यम वर्गीय माणसाचं स्वप्न एका क्षणात ध्वस्त झालेलं असतं.
सिनेमात या पॉइंटला एक गाणं आहे ते अतिशय परिणामकारक आहे..एस.पी बाल सुब्रमण्यम यांच्या त्या गर्भ रेशमी आवाजात.
बालू सरांनी गाण्याला पूर्ण न्याय दिला आहे. त्यातले सारे भाव आपल्या आवाजातून चपखल समोर आणत त्यांनी गाणं एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे.
जावेद साहेबांचे शब्द काळजाला भिडणारे आहेत. इतक्या कमी शब्दात इतकं अर्थपूर्ण लिहीणं ही जावेद साहेबांची खासियत आहे. आर.डी बर्मनचा उतरता काळ होता तरी या गाण्याला त्याने दिलेली चाल व संगीत अप्रतिम आहे. शेवटी Boss is Boss यात काही खोटं नाही.
गाण्याचा मुखडाच पहा ना..
पुरषोत्तमने पाहिलेले स्वप्न जणू काचेचं होतं पण या दुनियेच्या कठीण दगडावर आपटून त्याचा चक्काचूर झाला हे स़ांगणारा..
हम न समझे थे बात इतनी-सी
ख़्वाब शीशे के, दुनिया पत्थर की
हम न समझे थे बात इतनी-सी
झालेल्या घटनांनी बाप लेक दोघांच्याही आयुष्यात एक प्रकारचा अंध:कार भरुन राहिला आहे. उजेडा बरोबर नेहमी सावल्या येतात, पण आमच्या आयुष्यातील सावल्या इतक्या गहि-या होत्या की त्यांनी आयुष्यातील सारा प्रकाशच हिरावून घेतला, असे विचार त्यांच्या मनात येताना दिसतात.
आरज़ू हमने की तो ग़म पाए
रौशनी साथ लाई थी साए
साए गहरे थे, रौशनी हल्की
हम न समझे थे ...
पुढील अंत-यात देखील अतिशय अर्थपूर्ण भाव आहेत.
सिर्फ़ वीरानी, सिर्फ़ तन्हाई
ज़िंदगी हमको ये कहाँ लाई
खो गई हमसे राह मंज़िल की
हम न समझे थे ...
क्या कोई बेचे, क्या कोई बाँटे
अपने दामन में सिर्फ़ हैं काँटे
और दुकानें हैं सिर्फ़ फूलों की
हम न समझे थे ...
'अपने दामनमे सिर्फ है कांटे..और दुकानें हैं सिर्फ़ फूलों की'
काय शब्द आहेत..!! अंगावर काटा येतो. असा विचार बाप लेकाच्या मनात येतो ती किती apt आहे, किती चपखल आहे हे सिनेमा पाहताना व हे गाणं पाहताना जाणवतं.
विशेषतः पुरषोत्तम यांना आपल्या मुला बरोबर घालवलेले ते अनेक छान क्षण आठवत राहतात. ड्युटी करतानाही ती सारी दृश्य त्यांच्या डोळ्यासमोर येत राहतात, त्यांना भावनीक करत राहतात.
गाण्यात एका प्रसंगात रात्र पाळीवर काम करणारे पुरषोत्तम हातात प्रकाशाची बॅटरी घेउन फिरताना एक ठिकाणी अंधारात रस्त्याकडेला झोपलेल्या व्यक्तीवर फोकस मारतात. ती झोपलेली व्यक्ती त्यांचा शिवाच असतो. त्या प्रसंगी आपलं दुःख आपली वेदना चेह-यावर दाखवताना येणा-या अश्रुंना पुरषोत्तम कसबसं थोपवतात तो क्षण अतिशय भावनीक आहे. अमरीश पुरी हा काय ताकतीचा अभिनेता होता हे ही आपल्याला अशा प्रसंगांमधे जाणवतं.
प्रियदर्शनचे दिग्दर्शन, साउंड व पिक्चरायजेशन मधे असलेला दक्षिणी सफाईदारपणा, जावेद साहेब-पंचम जोडीची गाणी अन त्याच्या जोडीला सर्वांचाच अप्रतिम अभिनय यामुळे ह्या चित्रपटाने मोठी उंची गाठली.
बाप अन मुलगा हे नातं आपल्या भारतात खूप कमी बोललं जाणारं, लिहीलं जाणारं नात आहे. या थीमवर सिनेमे देखील खूप कमी आले आहेत. (शक्ती, घातक, असे काही अपवाद). गर्दीशमधे ते खूप छान पहायला मिळाले. हे गाणं त्या अवघडशा नात्यावरच भाष्य करतं..
बापाची किंमत तो गेल्यावर कळते असं म्हणतात ते काही खोटं नाही. आईसारखं बापाला रडून व्यक्त होता येत नाही. पण त्याच्या त्या वरवर नारळाप्रमाणे कठीण वाटणा-या हृदयात आपल्या मुलासाठी शहाळ्याचा गोडवा अन थंडावा दोन्ही असतो हेही तितकंच खरं आहे.
मुलासाठी आपलं आयुष्य पणाला लावणा-या पुरषोत्तम साठे सारख्या त्या सा-या अभागी बापांना सलाम व ही पोस्ट अर्पण..!! ????????
सोबत गाण्याची लिंक देतो आहे.नक्की पहा.
https://youtu.be/uoJXok3TEzw?si=8hgYeLYTl-L_tSks
®© सतिश साबळे (महाराष्ट्र सोशल मिडिया )
