उन्हाळ्यात दारू (मद्य)पिणे अत्यंत धोकादायक
हॉट असो चिल्ड उन्हाळ्यात मध्ये पिणे अत्यंत धोकादायक
महाराष्ट्र सोशल मीडिया: उन्हाळा रोज शिखरावर पोहचत आहे. विदर्भात तर रोज तापमान वाढ असून पुढील दिवसात विक्रमी तापमानाचा इशारा देण्यात आला आहे. हा उष्मा आणि परत त्यात दारूची उष्णता हा दुहेरी ( Double Dose ) अत्यंत घातक ठरू शकतो, असे वैद्यकीय वर्तुळ सांगते.भरदुपारी एकीकडे लग्न तर लगतच असलेल्या बारमध्ये वऱ्हाड्यांची झुंबड हे चित्र सरसकट दिसून येते. लग्न नसेल त्या गावी पण चिल्ड होण्यासाठी बारमध्ये गर्दी दिसून येते. हे फार धोकादायक असे म्हटले जाते.
उन्हाळ्यात मद्य धोकादायक
मद्य म्हणजे समाजात ज्यास दारू म्हटल्या जाते ते.यात वाईन, व्हिस्की, रम, व्होडका, बिअर असे व अन्य प्रकार आहेत. पण आता टाळाच. मद्य हे निसर्गता पाणी शोषून घेणारे आहे. जेव्हा मद्य घेतल्या जाते तेव्हा मूत्रपिंडाद्वारे शरीरातील पाणी बाहेर टाकण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात घाम निघतो. त्यातून पाणी व क्षार कमी होत जातात. त्यात मद्याची भर पडल्यास डिहायड्रेशन तीव्र होते. परिणामी चक्कर येणे, उष्माघात ( Heat Stroke ), रक्तदाब कमी व हृदय विकाराचा झटका असे धोके उद्भवतात. प्रसंगी मृत्यू ओढवतो.
अशी घ्या काळजी
मद्य टाळणे शक्य नसेल तर काही खबरदारी घेण्याचे सुचविल्या जाते. मद्याच्या प्रत्येक घोटासोबत ( Peg ) किमान दोन ग्लास पाणी प्या. मद्य घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर भरपूर पाणी घेणे आवश्यक. त्यामुळे शरीरातील आर्दता टिकून राहील. भर उन्हात मद्यपान टाळावे. शक्यतो सायंकाळी किंवा रात्री मद्यपान करावे. उन्हात मद्यपान केल्याने शरीरातील उष्णता लक्षणीय वाढते. उन्हाळ्यात नेहमीपेक्षा कमी मद्य घ्यावे. शरीरास मद्य पचविण्यासाठी अधिक ऊर्जा व पाणी लागते. ती उन्हाळ्यात पुरेशी मिळत नाही.Chilled पण धोक्याचे
उन्हाळा आहे म्हणून थंडगार बिअर घेण्याची मैफिल जमते. दुपारी बार या chilled बिअरने फुल्ल असतात. पण ते सुद्धा धोक्याचे असे डॉक्टर सांगतात. ज्यास्त अल्कोहल ( Alcohol ) असलेले Hard Drink टाळून सौम्य घ्यावे, असा सल्ला मिळतो. मात्र त्यात मोडणारी बिअर पण धोक्याची ठरू शकते. बिअर घेतांना ती अती थंड नसावी. कारण शरीराच्या अंतर्गत तापमानाशी त्याचा ताळमेळ बसत नाही. त्याचा पण शरीरावर विपरीत परिणाम होवू शकतो.
स्नॅक्स काय असावे?
मद्य घेताना नाना प्रकारचे खाद्य मद्यप्रेमी चखणा म्हणून चघळतात. पण घेताना काय खावे, याची पण दक्षता आहेच. अन्यथा आरोग्यावर विपरीत परिणाम होणार. अतिशय मसालेदार व तळलेले चिवडा, भजी, शेव व तत्सम किंवा अधिक मीठ असणारे पापड, खारवलेले शेंगदाणे असे टाळावे. मीठ अधिक असल्यास तहान वाढून डीहायड्रेशन वाढते.
मद्य हे शरीरातील पाणी काढणारे म्हणजे Diuretic असे आहे. हे पदार्थ टाळून काकडी, गाजर, सलाड यासारख्या पाणी अधिक असलेले खाद्य खावे. भाजलेले चणे किंवा उकडलेले शेंगदाणे उत्तम पर्याय ठरतात. यात सांगणे असे असे की मद्य घ्यायचे झाल्यास पाणी संतुलन व सकस आहार यावर भर द्यावा. त्याकडे लक्ष देऊनच उन्हाळ्यात प्रसंगिक किंवा आनंद उत्सव साजरा करावा. अन्यथा एक चूक जीवावर बेतू शकते.डॉक्टर म्हणतात…
येथील प्रख्यात माऊली हॉस्पिटलचे संचालक व मेडिसिन तज्ञ डॉ. पवन भांदककर हे म्हणतात की एक डॉक्टर म्हणून मी सांगेल की उन्हाळा असो की अन्य सिझन, मद्य नकोच. पण आता मद्यपान ही एक फॅशन झाली आहे. पण तरी उन्हाळ्यात तर खबरदारी घेतलीच पाहिजे. लघवीचे प्रमाण वाढत असल्याने शरीरातील पाणी कमी होवू नये याची काळजी आवश्यक. यकृत, हृदय व स्वादूपिंड या काळात धोक्यात येवू शकतात. म्हणून घ्यायची झाल्यास सकस खाद्य खाल्ले पाहिजे. प्रामुख्याने प्रथीनयुक्त पदार्थ खावेत. मद्य प्रमाण कमी करावे. या काळात आनंद हा दुःखाचे कारण होवू नये.
