महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कांतारा: अ लेजेंड – चैप्टर 1:एक अजरामर कलाकृती . सतिश साबळे

कांतारा: अ लेजेंड – चैप्टर 1:एक अजरामर कलाकृती . सतिश साबळे
October 09, 2025 07:23 AM ago Baramati, Maharashtra, India

काही सिनेमे मनावर दीर्घकाळ छाप सोडून जातात आणि आपण त्यांना एक अजरामर कलाकृती म्हणून संबोधित करू लागतो.

फार दिवसांनी भारतीय चित्रपटसृष्टीत असा नेत्रदीपक आणि भव्यदिव्य प्रयोग घडला — तो म्हणजे “कांतारा: अ लेजेंड – चैप्टर 1.”

ऋषभ शेट्टीने या सिनेमात स्वतःला अक्षरशः ३००% झोकून दिलं आहे. तुम्ही विचाराल ३००% का? तर या सिनेमात तो लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख अभिनेता या तिहेरी भूमिकेत आहे.

त्याचा पहिला कन्नड चित्रपट कंतारा, जो सन २०२२ मध्ये प्रदर्शित झाला, त्याचं बजेट होतं निव्वळ १५ कोटी आणि त्याने बॉक्स ऑफिसवर तब्बल ३०९ कोटींची कमाई केली. त्या चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे. दोन्ही चित्रपट एकमेकांशी जोडलेले असूनही पूर्णतः वेगळे आहेत.

पहिला चित्रपट पाहताना आपलं शिक्षित मन वारंवार सायरन वाजवत होतं — “ही सगळी अंधश्रद्धा आहे!” पण इथे असं अजिबात होत नाही. हा पूर्णतः mythological सिनेमा आहे, त्यामुळे इथं सर्व काही सहज स्वीकारार्ह वाटतं.

जर तुम्ही पहिला सिनेमा पाहिला नसेल, तरीही दुसरा पाहताना “पहिला पाहिला नाही” अशी खंत मनात डोकावत नाही.

सिनेमाची सुरुवात ऋषभ शेट्टीच्या voice over ने होते. तो अलवारपणे आपल्याला कधी भूतकाळात नेतो ते कळतही नाही. कथा कर्नाटकातील कंतारा जंगलात सुरू होते. या जंगलात एक सुंदर मधुबन आहे — देवांचा देश.

जिथे अक्षरशः सोनं (मसाले, औषधी वनस्पती) पिकतं असं म्हणायला हरकत नाही. या भूमीचं सौंदर्य अलौकिक आहे आणि तिचं रक्षण देवांचे गण स्वतः करतात. जेंव्हा लोकांवर संकट येतं, तेंव्हा हे गण मनुष्यरूप धारण करून त्यांचं रक्षण करतात.

ऋषभ शेट्टी म्हणजेच ‘बर्मे’ हा या सिनेमाचा नायक आहे — एक असा गण, ज्याला स्वतःची ओळख फार उशिरा समजते.

कंदब देशाचा अत्याचारी राजा कुलसेखर या मधुबनावर आपली नजर टाकतो आणि त्याच लालसेतून हे कथानक आकार घेतं.

मी इथं कथा सांगणार नाही, कारण कंतारा ही फक्त गोष्ट नाही — ती एक विलक्षण अनुभवयात्रा आहे, जी थिएटरमध्येच जाणवते.

सिनेमा थोडा वेळ घेतो स्वतःची establishment तयार करण्यात. सुरुवातीला कथानक थोडं raw आणि scattered वाटतं, पण तरीही व्हिज्युअल्स आपल्याला बांधून ठेवतात. खरा grip मात्र सिनेमा first half नंतर घेतो.

कनकवती म्हणजे या सिनेमातील नायिका रुक्मिणी — तिचं पात्र अतिशय सुरेख रंगवलं आहे. मी सुद्धा reviews वाचूनच सिनेमा पाहायला गेले होते, त्यामुळे interval मध्ये प्रश्न पडला की “हिला एवढं का नवाजलं गेलं?”

त्याचं उत्तर मात्र second half मध्ये अप्रतिम पद्धतीने मिळतं.


काय आवडलं?

अरविंद कश्यप यांची सिनेमॅटोग्राफी — अप्रतिम!

बी. अजनीश लोकनाथ यांचं संगीत — एकदम मंत्रमुग्ध करणारं.

टोडोर लैझरोव यांची फाइट कोरिओग्राफी -- just Amazing.

आणि अर्थातच ऋषभ शेट्टीचा अभिनय — बर्मेच्या आईच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याच्या अंगात देव येतात, त्या प्रसंगातील त्याचा अभिनय म्हणजे अक्षरशः अभिनयाचं शिखर! एकदम नैसर्गिक, सहज आणि अस्सल.


सिनेमाची कमकुवत बाजू

कमकुवत म्हणण्यापेक्षा खटकलेली गोष्ट म्हणजे — कन्नडहून हिंदीत केलेला अनुवाद.

संवाद लेखन अतिशय सुमार आहे, विशेषतः गुलशन दैवीयचे संवाद तर ऐकण्याजोगेच वाटत नाहीत.

एकदम टपोरी आणि विसंगत भाषा वापरली गेली आहे, जी सिनेमाच्या गूढ आणि पौराणिक जॉनरशी जुळत नाही.

तसंच, antagonist म्हणजे खलनायक थोडेसे कमकुवत भासतात.

बाकी चित्रपट एकदम सुरेख आहे.

पहिल्या अर्ध्यात थोडं संयम राखावा लागतो, पण second half अप्रतिम अनुभव देते.

शेवटी जेंव्हा “A Film by Rishabh Shetty” हे नाव मोठ्या पडद्यावर झळकतं — तेव्हा उर अभिमानाने भरून येतो.

नक्की पाहा — हा सिनेमा म्हणजे एक विलक्षण कलाकृती आहे ! ????

समिक्षण

©® सतिश साबळे


संबधित बातम्या