गुणवंत खेळाडू तयार करण्यासाठी विशेष योजना – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. 7: खेळाडूंना प्रोत्साहन देत राज्यात गुणवंत खेळाडू तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असल्याचे क्रीडा, युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे ते पदभार स्वीकालाच्या प्रसंगी मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
गुणवंत खेळाडू घडवण्यासाठी ठोस उपाययोजना
मंत्री श्री. भरणे म्हणाले की, "युवा पिढीत क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्यांना वाव देण्यासाठी धोरणात्मक उपक्रम राबवले जातील. राज्यात गुणवंत खेळाडूंना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचे अंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत."
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान
पदभार स्वीकालानंतर मंत्री श्री. भरणे यांनी विविध राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला. पद्मश्री मुरलीधर पेटकर (जलतरण), द्रोणाचार्य पुरस्कार विजेती दिपाली देशपांडे (शुटिंग), अर्जुन पुरस्कार विजेते सचिन खिल्लारी (गोळाफेक) आणि स्वप्निल कुसाळे (शुटिंग) यांना त्यांनी सन्मानित केले. "या खेळाडूंनी देशासह राज्याचे नाव उज्ज्वल केले असून त्यांचे यश भविष्यातील खेळाडूंना प्रेरणा देईल," असे मंत्री श्री. भरणे म्हणाले.
कल्याणकारी योजनांवर भर
मंत्री श्री. भरणे यांनी अल्पसंख्याक आणि युवकांसाठीही कल्याणकारी योजना राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट स्पष्ट केले. या योजनेतून युवकांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, आणि सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा आयुक्त हिरालाल सोनावणे, सहसंचालक सुधीर मोरे, उपसंचालक नवनाथ फडतरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंत्री श्री. भरणे यांच्या नेतृत्वात राज्याच्या क्रीडा क्षेत्रात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.