महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

धर्मेंद्र नावाचा ही मॅन... तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

धर्मेंद्र नावाचा ही मॅन... तब्बल सहा दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
November 25, 2025 08:15 AM ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मीडिया ; लहानपणी सिनेमातील विविध अभिनेत्यांची नक्कल करायची हौस यायची बरेचदा, त्यात धर्मेंद्र हमखास असायचा. थोड्याशा नाकपुड्या फुगवून त्याचा शोले मधला फेमस डायलॉग मग मारला जायचा. बसंती इन कुत्तों के सामने मत नाचना किंवा कुत्तों मैं तुम्हारा खून पिजाऊंगा असे डायलॉग मारताना जाम मजा यायची. तसंच डान्स करताना हमखास धर्मेंद्र डान्स याच नावाने प्रसिद्ध असलेला मैं जट्ट यमला पगला दिवाना करत बेधुंद होऊन जायचा.


पण आज सगळं शांत शांत झालं. ९० दीतला आमचा ही मॅन भौतिक दृष्टीने हा इहलोक सोडून गेला. खरंतर यांवर अजूनही विश्वास बसत नाहीये. १९६० पासून सुरू झालेली त्याची झळाळती कारकीर्द अगदी ९० वर्षांत पण इक्कीस या सिनेमापर्यंत चालू होती. धर्मेंद्र पडद्यावर नेहमीच उमदा, फ्रेश वाटला. तो कधीच कंटाळवाणा झाला नाही. त्याच्या इतके ज्युबीली सिनेमे बहुतेक कोणीही दिलेले नाहीत. अगदी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन पेक्षाही धर्मेंद्र चे ज्युबीली काकणभर जास्तच असतील. १९६० च्या दशकांत अनपढ, बंदिनी, आई मिलन की बेला, हकीकत, काजल, फूल और पत्थर, देवर,अनुपमा, मजली दिदी, शिकार, इज्जत, आंखे, मेरे हमदम मेरे दोस्त, सत्यकाम, यकीन, आया सावन झुम के सारखे जबरदस्त सिनेमे केले. राजेश खन्ना च्या झंझावातात जर कोणी तग धरून राहिला असेल तर तो होता फक्त धर्मेंद्र. १९७० च्या दशकांत पण त्याने जीवन मृत्यू, शराफत, नया जमाना, मेरा गाव मेरा देश, राजा जानी, समाधी, सीता और गीता , दो चोर, जुगनु, लोफर, यांदो की बारात, झील के उस पार, ब्लॅकमेल, दोस्त, कहानी किस्मत की, शोले, प्रतिज्ञा, चुपके चुपके,चरस, चाचा भतिजा, धरमवीर, आझाद, शालीमार, फंदेबाज असे तगडे सिनेमे केले, तर १९८० च्या दशकांत तो निर्माता झाला. सनी करता बेताब व घायलची निर्मिती केली. या बरोबरच १९९० च्या दशकांत धाकट्या बाॅबी साठी बरसात ची निर्मिती केली.


धर्मेंद्र प्रचंड मोठा स्टार होता परंतु तितकाच तो मोठा माणूस पण होता. शेकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्यांसाठी त्याचा जीव व्याकूळ होत असे. त्यांची दुःख त्याला ज्ञात होती. उत्तर आयुष्य त्यानं बरेचदा शेती करण्यात मग्न केले. २००४ ला तो खासदार पण झाला. बाॅबी चे करिअर सावरताना अपने, यमला पगला दिवाना सारख्या हीट सिनेमांची निर्मिती केली. राहुल रवैल, राज कुमार संतोषी, अनिल शर्मा सारख्या नवख्या दिग्दर्शक लोकांना पुढे आणण्यात धर्मेंद्र चा मोलाचा वाटा आहे. बाकी धर्मेंद्र आणि हेमामालिनी व शोले हा लेखनाचा स्वतंत्र विषय आहे.


हिरो हा Body Builder पण असतो याचं पहिलं ज्ञान प्रेक्षकांना देणारा जर कोणी होता तर तो म्हणजे धर्मेंद्र. म्हणून तो आद्य ही मॅन ठरला. पहिल्या ही मॅनच्या मुळेच पुढं बऱ्याच अभिनेत्यांना Body Building ची प्रेरणा मिळाली असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. असो. आज हा महानायक काळाच्या पडद्याआड गेला. मोहम्मद रफी त्याचा प्रचंड आवडीचा गायक होता. म्हणून आज धर्मेंद्र गेल्यावर रफीचेच एक गाणं कानात रुंजी घालत होते.....


आज मौसम बडा बेईमान है आज मौसम.


खरंच धर्मेंद्र फक्त शरीर रुपात नसणारे पण तो त्याच्या असंख्य सिनेमांमधून कायम त्याच्या प्रेक्षकांबरोबर सतत असणारे....


भावपूर्ण श्रद्धांजली - ही मॅन ???



©® सतीश हनुमंत साबळे

संपादक/अध्यक्ष : महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य.


#maharashtrasocialmedia

संबधित बातम्या