महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

रवींद्र हणमंत महाजनी (महाराष्ट्र सोशल मिडिया)

रवींद्र हणमंत महाजनी (महाराष्ट्र सोशल मिडिया)
February 01, 2025 02:31 PM ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडिया :- मराठी चित्रपटांमध्ये एक काळ गाजविणारे आणि आपल्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांच्या विशेषत: तरुणींच्या मनावर अधिराज्य गाजविणारे त्या काळचे ‘हॅण्डसम हंक’ हरहुन्नरी कलावंत, म्हणजेच दिलखुलास अभिनेते रवींद्र महाजनी .

रवींद्र महाजनी यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९४६ साली बेळगाव,कर्नाटक येथे झाला. ज्येष्ठ पत्रकार व एका प्रथितयश वर्तमानपत्राचे संपादक हणमंत रामचंद्र महाजनी (ह.रा. महाजनी) हे त्यांचे वडील होते. रवींद्र यांच्या अगदी लहानपणीच त्यांच्या वडिलांना नोकरीनिमित्त बेळगाव सोडून मुंबईला यावे लागले. त्यामुळे रवींद्रंचे संपूर्ण शालेय व महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झाले. त्यांची अभिनयाची आवड शाळेपासूनच त्यांनी जोपासायला सुरुवात केली होती. त्याची चमक ते सहभागी झालेल्या विविध स्पर्धांमधून आणि शाळेतील स्नेहसंमेलनांमधून पाहायला मिळत होती. भविष्यामध्ये नाटक आणि सिनेमातील अभिनय हेच त्यांचं ध्येय निश्चित झालं होतं. परंतू इंटर सायन्सला अनुत्तीर्ण झाल्यावर त्यांच्या पदरी निराशा आली. अशातच वडिलांच्या सांगण्यावरून रवींद्रंनी बी.ए. पूर्ण करायचं ठरवलं आणि त्यासाठी मुंबईतील खालसा महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला.

रवींद्रंनी बी.ए. पास केल्यानंतर, शिक्षण जरी पूर्ण झालं तरी त्यांची अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. हळूहळू त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये हात-पाय मारायला सुरुवात केली. परंतु एकीकडे हे प्रयत्न सुरू असतानाच वडिलांचं निधन झालं आणि घरची आर्थिक जबाबदारी त्यांच्यावर पडली. पैसे कमवणे खूप गरजेचे होते. म्हणून त्यांनी इतर काही छोटी-मोठी कामं करायला सुरुवात केली. आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतूदींसाठी म्हणून त्यांनी अगदी टॅक्सी ड्रायव्हर म्हणूनही काम केलं. दिवसा निर्मात्यांना भेटायचं ऑडिशन द्यायचं आणि रात्री टॅक्सी चालवायची. अशी कसरत तीन वर्षे चालली. असं म्हटलं जातं की, एका वर्तमान पत्राच्या संपादकाचा मुलगा आणि टॅक्सी चालवतो, म्हणून त्यांचे नातेवाईकही त्यांच्यापासून दूर गेले. र्थातच ही अवहेलना फार काळ टिकणारी नव्हती. रात्री टॅक्सी चालवून दिवसा आपल्या अभिनयाच्या आवडीला वेळ देणाऱ्या रवींद्रंना मधुसूदन कालेलकर यांची साथ मिळाली.

देखण्या रुबाबदार रवींद्र महाजनी यांना मधुसूदन कालेलकर यांनी त्यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकामध्ये प्रथम संधी दिली. रवींद्र महाजनींनीही त्या संधीचं सोनं केलं. लागलीच कालेलकरांनीही या रूबाबदार युवकाला समोर ठेवून ‘तो एक राजहंस’ हे नाटक लिहिलं. त्यातही रवींद्र महाजनी यांची वर्णी लागली. नियतीने रवींद्रना साथ द्यायला सुरुवात केली होती. म्हणूनच की काय, या नाटकाचा एक प्रयोग पाहण्यासाठी निर्माता दिग्दर्शक व्ही. शांताराम पोहोचले. त्यांनी रवींद्र महाजनींचे काम पाहून, त्यांना ‘झुंज’ या चित्रपटात मुख्य नायकाची भूमिका देऊ केली. झुंजला यश तर मिळालं. त्याची रौप्य महोत्सवी वाटचाल झाली आणि रवींद्र महाजनींच्या रूपाने एका देखण्या रुबाबदार नायकाचं मराठी चित्रपट सृष्टीत आगमन झाल्याचं अधोरेखित केलं. रवींद्र महाजनींचा नऊ वर्षांचा अविरत संघर्ष संपला आणि त्यांनी पुन्हा पाठी वळून पाहिलं नाही. यानंतर आराम हराम है, लक्ष्मीची पावलं, लक्ष्मी, गोंधळात गोंधळ, देवता, हळदी कुंकू, सून माझी लक्ष्मी, लागे बांधे, उनाड मैना, देवघर, जुलूम, अर्धांगी, राखणदार, कशाला उद्याची बात, दुनिया करी सलाम, हिच खरी दौलत, नवऱ्याने सोडली, देवघर, धडाका, सुळावरली पोळी, मुंबईचा फौजदार असे अनेक यशस्वी चित्रपट त्यांनी केले. चांगल्या कथा आणि पटकथेसोबतच रवींद्र महाजनी यांचं देखणं रूप आणि रुबाबदार व्यक्तिमत्व याचं समीकरण मराठी चित्रपट सृष्टीच्या पटलावर अनेक वर्ष हिट ठरलं.

चित्रपट सृष्टीमध्ये ग्रामीण तमाशापटांचा जोर असलेल्या जमान्यामध्ये रवींद्र महाजनी यांचं आगमन झालं होतं. परंतु त्या काळातल्या निर्मात्यांनी त्यांच्या शहरी व्यक्तिमत्वाला साजेशा कथा निर्मित केल्या. आपल्या कसदार अभिनयाने रवींद्र महाजनी यांनीही त्याला न्याय दिला. सोबतच रवींद्रजींनी बेल भंडार आणि अपराध मीच केला या नाटकांचेही अनेक प्रयोग केले आहेत. काही वर्षांपूर्वी रवींद्र महाजनींनी ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माता-दिग्दर्शकाची भूमिकाही बजावली होती.

रवींद्र महाजनी यांनी माधवी मोटे यांच्याशी विवाह केला.ओळख होण्याआधीच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या होत्या.रविंद्र महाजनी माधवीच्या प्रेमात पडले. त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले.त्यांना रश्मी आणि गश्मीर ही दोन मुले.

रवींद्र महाजनींच्या चित्रपट कारकिर्दीची आणखी एक खास बाब म्हणजे त्यांच्या वाट्याला चित्रपटांमधून सुरेल गाणी आली. त्यांच्या झुंज या चित्रपटातील कोण होतीस तू काय झालीस तू आणि निसर्गराजा ऐक सांगतो , मुंबईचा फौजदार मधील सहजीवनात आली ही स्वप्न सुंदरी आणि हा सागरी किनारा, राखणदारमधील नातं तुझं नी माझं, जाशील कोठे मुली तू, हात दे मस्तधुंद साथ दे ही आणि अशी कित्येक गाणी सुरेल उदाहरणं आहेत. अभिनेत्री रंजना, आशा काळे, उषा नाईक या तिघींसोबत रवींद्र महाजनी यांची अनेक चित्रपटांमध्ये जोडी जमलेली आपल्याला पाहायला मिळते. काही निवडक चित्रपटांमध्ये त्यांनी प्रिया तेंडुलकरांसोबतही भूमिका निभावलेली आहे. रवींद्र महाजनी यांना मराठी चित्रपटाला लाभलेला विनोद खन्ना असंही म्हटलं जात असे. रवींद्र महाजनी यांच्या रूपाने मराठी चित्रपटाला खरोखरच एक हिंदीच्या तोडीचा अभिनेता गवसला होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मावळ तालुक्यातील, तळेगाव दाभाडे येथील आंबी या ठिकाणी असलेल्या सोसायटीमध्ये रवींद्र महाजनी भाडेतत्त्वावर एकटेच राहत होते. त्यांचा मृत्यू होऊन दोन-तीन दिवस लोटले तरी कोणाला काही कळले नाही १५ जुलै २०२३ रोजी दुर्गंधी येऊ लागली म्हणून आसपासच्या नागरिकांनी पोलिसांना कळवले. तेव्हा ते रवींद्र महाजनी असल्याचे कळले. ‘तो एक राजहंस’ अशा पद्धतीने जगाचा निरोप घेऊन जावा हे हृदयद्रावक आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा गश्मीर महाजनी, मुलगी डॉ. रश्मी, सून आणि नातवंडं असा परिवार आहे.

रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांनी त्याचं आत्मचरित्र प्रकाशित केलं. 'चौथा अंक' असं या पुस्तकाचं नाव असून या आत्मचरित्रात माधवी यांनी त्यांच्या आयुष्यातले काही चांगले -वाईट अनुभव शेअर केले आहेत. या पुस्तकात त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. यात माधवी यांनी रवींद्र महाजनी यांच्यासोबतचा संसार कसा होता, त्यांचं नात कसं होतं या सगळ्यावर उघडपणे भाष्य केलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात त्यांनी रवींद्र महाजनी आणि त्यांची लव्हस्टोरी सुद्धा सांगितली आहे. रवींद्र महाजनी यांनी तरुणपणात केलेल्या काही चुकांमुळं त्यांना तसंच कुटुंबालाही आयुष्याभर त्याचे परिणाम भोगावे लागले. अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा या पुस्तकात आहे.

#महाराष्ट्र सोशल मिडिया

संबधित बातम्या