महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

चित्रपट: कोर्ट – स्टेट व्हर्सेस नोबडी

चित्रपट: कोर्ट – स्टेट व्हर्सेस नोबडी
June 08, 2025 01:53 PM ago Baramati, Maharashtra, India

हा केवळ एक चित्रपट नाही, हा आरसा आहे आपल्या समाजाचा. जिथे पैशाची ताकद असलेले लोक गरिबांना आपल्या फायद्यासाठी वापरतात, पिळवणूक करतात, अगदी निरपराध व्यक्तीलाही गुन्हेगार ठरवतात. मी जेव्हा हा चित्रपट पाहिला, तेव्हा खरंच मन हेलावून गेलं. वकिलाची भूमिका साकारणारा अभिनेता पूर्वी अनेकदा साइड रोलमध्ये, हिरोचा मित्र म्हणून दिसायचा. पण जेव्हा या चित्रपटाचं पोस्टर पाहिलं, तेव्हा मनात शंका आली — "हा काय कमाल करेल?" पण चित्रपट पाहिल्यानंतर त्याचं काम इतकं जबरदस्त वाटलं, की माझी मतं पूर्णपणे बदलली. खरंच, आता मी त्याला हिरो म्हणेन. त्याला त्याच्या क्षमतेची जाणीव थोडी उशिरा झाली, किंवा कोणीतरी त्यात ती क्षमताच शोधली, पण ते काम अविस्मरणीय आहे. चित्रपटातील ‘मंगपती’ या पात्राचं कामही जबरदस्त आहे – एक नंबरचा कपटी. आणि जो मुलगा अपराधी म्हणून दाखवला आहे, त्याचे अभिनय कौशल्यही खूप प्रभावी वाटले. हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. नेटफ्लिक्स तुम्हाला कधी नाराज करत नाही, आणि 'कोर्ट' हा चित्रपट तर याचं उत्तम उदाहरण आहे. पूर्ण चित्रपट कोर्टरूममध्ये घडतो, पण जिथे संवाद कमी आहेत, तिथे दृश्यं खूप बोलकी वाटते. हा सिनेमा सहजपणे ‘सैराट 2.0’ होऊ शकला असता, पण इथे ‘राक्षसांना माणसाचा जन्म’ मिळतो आणि लढाईचं स्वरूप बदलतं. "डेट ऑफ जजमेंट" च्या दिवशी, एक वकील पूर्णपणे हरलेली केस लढण्याचा निर्णय घेतो – आणि आपण चित्रपट पाहताना जजच्या वरचं जज होऊन बसतो! खरं आणि खोटं ठरवतो. आणि प्रश्न निर्माण होतो – अठराव्या वर्षाच्या एका दिवसात अशी काय जादू होते की पूर्ण कायदेशीर व्याख्या बदलते? हा चित्रपट फटफटीचा नाही, फरफटीचा आहे – म्हणून त्याचं कथानक हळूहळू उलगडतं. काहीजणांना ते संथ वाटू शकतं, पण त्यातली खोली वेगाने नाही, तर विचारांमधून जाणवते. वर्षानुवर्षे एक केस का लांबते? आणि खरं-खोटं ठरवायचं काम कोर्टापर्यंतच का यावं लागतं? या प्रश्नांची उत्तरं शोधताना हा चित्रपट अंतर्मुख करतो. निष्कर्ष: ‘कोर्ट’ हा चित्रपट पाहणं म्हणजे केवळ कथा अनुभवणं नाही, तर समाज, न्यायव्यवस्था आणि आपल्या मानसिकतेचं आरसभरं दर्शन. प्रत्येकाला हा चित्रपट किमान एकदा तरी नक्की पाहावा.

संबधित बातम्या