बत्तीस फोटोचा रोल (महाराष्ट्र सोशल मिडिया)

"हॉटशॉट" ची जाहिरात आठवते का? "खटॅक". प्रत्येक सहलीला, वाढदिवसाला, इतर शुभप्रसंगी, हा ट्रांझीस्टरच्या आकाराचा कॅमेरा वापरल्याचं आजही आठवणीत आहे. बाकी प्रोफेशनल कॅमेरा केवळ फोटोग्राफर मंडळीकडेच असायचे. हे लोक लग्न प्रसंगी किंवा ऐतिहासिक स्थळावरच दिसायचे. आज अनेकांकडे डिजिटल कॅमेरे झूम लेन्सेस असतात. ज्यात हवे तेवढे फोटो येतात. मुख्य म्हणजे ते टिपल्यावर लगेच दिसतात. आवडले तर ठेवायची, नाहीतर खोडून टाकायची सोय असते. पण त्या काळी, साधारण बत्तीस फोटोच्या रीलची डब्बी असायची आणि सहसा एक दिवसाच्या सहल, कार्यक्रमाला एकच रोल घेतला जायचा. मग पत्येक फोटो काढतांना, रिडींग पाहिलं जायचं, किती उरले ते समजायला. बत्तीस नंतर आणखी फोटो आले, तर ते बोनस असायचे. रोल संपल्यानंतर तो नीट गुंडाळून, डबीत ठेवून, डेव्हलप करायला, म्हणजे धुवायला टाकायचा. डेव्हलप होऊन फोटो हातात येई पर्यंत फार कुतूहल असायचं. फोटो हातात आल्यावरचा तेव्हाचा आनंद वेगळाच होता. त्या कुतूहलातच गंम्मत असायची. सगळं इन्स्टंट मिळतंय आता, त्यामुळे सध्या कुतूहल विसरून गेलोय आपण. तेव्हा, फोटो डेव्हलप करायला टाकायची जबाबदारी, आमच्या एकत्र कुटूंबात माझ्यावर होती. तेव्हाच्या व्हिटी स्थानकाजवळच्या अंडरग्राउंडमध्ये कोलो फोटो स्टुडिओत सकाळी जाताना रोल द्यायचो आणि संध्याकाळी फोटो मिळायचे. कोरा अल्बम आणि जितके येतील तितके फोटो. मी त्या दुकानात बसूनच सगळे फोटो पहायचो. नंतर पुन्हा लोकल ट्रेन मध्ये बसल्यावर पहायचो. कारण घरी आल्यावर सगळे तुटून पडायचे त्या अल्बमवर. तेव्हा बत्तीस फोटोचं रेशनिंग असल्यामुळे प्रत्येक फोटो विचारपूर्वक काढला जायचा. सेल्फी चं वेड नसावं तेव्हा. आता लोकं सेल्फिश झालेत. प्रेक्षणीय, सुंदर स्थळावर फोटो काढताना, ति वास्तू, जागा, निसर्ग दुय्यम असतं हल्ली, स्वतःचा चेहरा महत्वाचा. म्हणजे कॅमेरात निसर्ग सौंदर्य टिपतात, की आपण तिथे जाऊन आलो, याचे पुरावे गोळा करतात, कोण जाणे.