काही सिनेमे आवर्जून बघावेत . सतिश(भाऊ)साबळे

September 18, 2024 03:43 PM ago
Baramati, Maharashtra, India
पा. रंजित दिग्दर्शित '#तंगलान' हा सिनेमा म्हणजे स्वाभिमानाची हक्काची लढाई. 'तंगलान' हा सिनेमा फक्त गोष्ट सांगणारा सिनेमा नाही, तर शोषित आणि वंचित मूलनिवासी समुदायाच्या संघर्षाची खणखणीत कहाणी आहे. पा. रंजीतने नेहमीच आपल्या सिनेमातून समाजातील दुर्बल, शोषित वर्गांना आवाज दिलाय...आणि 'तंगलान' या सिनेमातून त्याने एका संघर्षाची, स्वाभिमानाची गोष्ट ताकतीने मांडलीय. सिनेमात वेळोवेळी दाखवलेली बुद्ध मूर्ती हे फारच महत्त्वाचं प्रतीक आहे. बुद्ध म्हणजे शांततेचं, समानतेचं आणि अन्यायाविरुद्धच्या लढाईचं प्रतीक. यातूनच चित्रपटात दाखवलय की, शोषणातून मुक्त होण्याची आणि आपला हक्क मिळवण्याची ही लढाई आहे. बुद्धाचं तत्त्वज्ञान म्हणजे शांतपणे, पण ठामपणे अन्यायाला विरोध करणं..आणि समानतेसाठी लढणं. त्यामुळे सिनेमात दाखवलेली बुद्ध मूर्ती केवळ धार्मिक नाही, तर ती सामाजिक न्याय आणि आत्मसन्मानाची प्रेरणा आहे. सिनेमातील नायक चियान विक्रम याने साकारलेली भूमिका तंगलान म्हणजेच एक योद्ध्याची आहे. जो आपल्या मूलनिवासी असलेल्या जमातीच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी लढतोय. त्याचे डॉयलॉग हे स्वाभिमान, अन्यायाविरोधात उभं राहणं आणि आपल्या हक्कांसाठी लढण्याचेच आहेत. जस कि, "आपल्या माणसांच्या हक्कांसाठी आम्ही शेवटपर्यंत लढणार." "स्वाभिमान हीच आमची खरी ओळख आहे, त्यासाठी आम्हाला कोणत्याही किंमतीला मागे हटायचं नाही." ‘तंगलान’ मधली आरती हे पात्र त्या संघर्षशील महिलांचं प्रतिनिधित्व करते, ज्या फक्त कुटुंबापुरता नाही, तर संपूर्ण समाजाच्या लढाईत महत्त्वाची भूमिका निभावतात. ती लढाईतल्या इतर पात्रांसोबत संघर्ष करते, त्यांना साथ देते आणि त्यांच्या हक्कांसाठी न थांबता लढते. या पात्राच्या माध्यमातून, पा. रंजीत याने महिलांचा संघर्ष आणि त्यांच्या स्वाभिमानाची ओळख उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. 'तंगलान' हा फक्त ऐतिहासिक सिनेमा नाही, तर आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरही एक ठोस संदेश देणारा सिनेमा आहे. स्वाभिमान, आत्मसन्मान, आणि सामाजिक न्यायासाठी लढणाऱ्यांसाठी हा चित्रपट खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. सिनेमा नक्की बघा एवढीच यानिमित्ताने विनंती करतो. काही सिनेमे आवर्जून बघावेच.