महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

राज्याची तिजोरी- तीन चाव्यांची (सतिश(भाऊ)साबळे

स्थानिक निवडणुकांसाठी प्रचाराचा धुराळा उडाला.आपापला गड मजबूत करण्यासाठी मुख्य आणि दोन्ही उप सरसावले.
राज्याची तिजोरी- तीन चाव्यांची (सतिश(भाऊ)साबळे
November 29, 2025 01:29 PM ago Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडिया-राजधानीत मांडीला मांडी लावून बसणारे गावोगावी पोहोचताच एकमेकांवर शरसंधान करु लागले.कोण आपला कोण परका याचा विचार करत बसायला वेळ नव्हता.प्रत्येकाच्या डोक्यात फक्त स्वतःचा विचार घुमत होता.प्रत्येकजण आपणच जनतेचं भलं करु शकतो हे ठसवायसाठी रोज वेगळं पिल्लू सोडत होता.बिळातून बाहेर येणार्‍या उंदरावर झडप घालायला बोका तयारच असतो तसा मीडिया टपूनच बसला होता.सध्या तशी चंगळच होती म्हणा त्यांची.ब्रेकिंग चालवायला,व्यूव्हज आणि लाईक वेगाने वाढवायला बक्कळ कंटेंट हरघडी मिळत होतं.एरवी मीडियाच्या ब्रेकिंगला तोलून मापून बोलत ब्रेक लावू पहाणार्‍या नेतेमंडळींची गाडी भरधाव वेगात सुसाट सुटली होती.

एका उप (दादां)नी जोरदार धमाका केला.माझ्याकडे तिजोरीची चावी आहे,माझ्या चिन्हावर फुली मारली तर मी तुमच्या भागावर फुली मारीन,तुमच्या साठी तिजोरी उघडणार नाही असं ठणकावून सांगितलं.

मुख्य आणि दुसरे उप यांच्या तंबूत खळबळ माजली.आपल्याच सहकार्‍याने आणलेली ही अकाली 'वर्षा ' कशी थोपवावी हे मुख्य यांना समजेना.त्यांनी आपल्या विश्वासू शिलेदारांशी कानगोष्टी सुरु केल्या.

दुसरे उप आपले ठाणे मजबूत करण्याच्या चिंतेत होते.आधीच आटलेला आनंदाचा शिधा आणि आता आपल्या शिध्यात आणखी कपात होण्याचं सूतोवाच त्यांच्या धीरगंभीर चेहर्‍यावर चिंतेचं जाळं पसरवू लागलं.बापरे, हातघाईला आलेली लढाई सोडत पुन्हा दिल्ली गाठावी की काय हा विचार त्यांना अस्वस्थ करु लागला.

तिजोरीच्या चावीचा हा वाक् बाण करामत करु लागला.अनेकांची बराच काळ मुश्किलीने बंद ठेवलेली तोंडे उघडू लागली.मीडियाच्या पानात अजीर्ण व्हावे इतकी मेजवानी (नेहमीसारखी धावाधाव न करताही) आयतीच येउन पडू लागली.खुद्द उप (दादांना) आपण सोडलेला बाण मागे कसा घ्यावा हे उमजेना.

पुणे मुक्काम (तात्पुरता) हलवणार्‍या दुसर्‍या दादांनी तिजोरीची चावी तुमच्याकडे असली तरी मालक आमच्याकडे असल्याची पुडी सोडली. आपण तरी खरे मालक आहोत का या विचाराने खुद्द मुख्य गोंधळून गेले.शिवाय आता (नेहमीप्रमाणे) अभ्यास करायलाही हाताशी वेळ नव्हता.एका कांताने निर्माण केलला प्रश्न दुसर्‍या शेखराकडे कडे सोपवायचा निर्णय त्यांनी तत्काळ घेतला.

चंद्रशेखरांपुढे देखील पेच उभा होताच.आपण बावन मार्गानी भर घालतो ती तिजोरी ,तिचा नक्की मालक कोण आणि कूळे कोण त्यांनाही ठरवता येईना.

बोलण्या बोलण्यात गेलं असेल.प्रत्येकाचा झुकाव आपल्या भागाकडे असतो असं त्यांनी सांगून बघितलं.पण ते इतरांनाही पटेना आणि त्यांना स्वतःलाही.शेवटी बराच विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की दिल्लीकरांचा झुकाव कोणाकडे आहे याचा अंदाज घेउन बोललेलं बरं.त्यांनी मनोमन दिल्लीकर सूर्य चंद्रांचा धावा सुरु केला.बराच वेळ ध्यानस्थ बसल्यावर त्यांच्या मनी प्रकाश दाटला आणि त्यांचा चेहरा उजळला.

"ही तिजोरी नेहमीच्या तिजोरीसारखी नाही.बॅंकेचा लाॅकर जसा मालकाची चावी आणि बॅंकेची चावी लावल्याशिवाय उघडत नाही तशीच ही तिजोरी आहे.पण तिचं आणखी एक वैशिष्ट्य आहे.ही तिजोरी तीन चाव्या लावल्याखेरीज उघडत नाही.त्यामुळे सध्या तिजोरीची मालकी आमच्या पक्षाकडे असली तरी इतर दोघांनीही चावी लावल्याशिवाय तिजोरी उघडत नाही."त्यांनी खुलासा केला.तिजोरी उघडायची तर आपण तिघेही आवश्यक हा संदेश सगळीकडे पसरला.सगळीकडे आनंदी आनंद पसरला.सगळा धुरळा खाली बसला.अशी ही तीन चाव्यांच्या तिजोरीची कहाणी सुफळ संपूर्ण.


संबधित बातम्या