Mrs Deshpande.. वेळ मिळाला तर अवश्य पहा.. सतीश साबळे..
ह्या सिनेमाने आपल्या जगप्रसिद्ध मुंबई पोलिसांना भन्नाट आयडिया दिली आहे
महाराष्ट्र सोशल मीडिया आजवर अनेक सिनेमांमधून पोलिसांची टर उडविली गेली आहे. म्हणजे सर्व गुन्हा घडून गेल्या नंतर त्या स्थळीं सायरन वाजवत पोलिसांच्या गाड्यांचा ताफा हजर होतो / धावणाऱ्या गुन्हेगारामागे पोलिस ' ए, रुक रुक!' असं ओरडत हातात पिस्तूल घेऊन ठराविक अंतर राखून धावत राहतात. जणू काही पोलिसांचा आदेश ऐकून तो थांबणारच आहे.
जाऊदे! सिनेमातील पोलिस ह्या विषयावर आपण नंतर कधीतरी बोलू . Mrs Deshpande मध्ये तर पोलिस इतके ढ दाखवले आहेत. एका सिरीयल किलरला पकडण्यासाठी ते चक्क पंधरा वर्षं तुरुंगात शिक्षा भोगत असणाऱ्या ( वर्षं कमीजास्त असतील... ती मोजत बसू नका!) एका माजी सिकिची, तिच्या सर्व अटी मान्य करुन तुरुंगाबाहेर राजेशाही बडदास्त ठेवून मदत घेतात. तिच्या हातचं जेवून चांगले सात आठ पोलीस बेशुद्ध पडतात आणि पोलीस खातं त्यांच्यावर कांहीही कारवाई करीत नाही.
ह्या सिनेमाने आपल्या जगप्रसिद्ध मुंबई पोलिसांना भन्नाट आयडिया दिली आहे. ह्यापुढे चोर, दरवडेखोर, खुनी, बलात्कारी इत्यादी सर्व गुन्हेगारांना पकडण्यासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ माजी तुरुंगवासी गुन्हेगारांचा वापर करता येईल . पोलिस भरतीसाठी त्या थकवणाऱ्या परीक्षा पण द्यायला नकोत आणि यादी जाहीर होण्याची वाट पाहायला नको .
माधुरी पोलिस कमिशनरला पहिल्या पासूनच ' अरुण ' म्हणते. म्हणजे हे त्याचंच नाव असतं. पण मला वाटलं हाच suspence thriller आहे की काय! मी त्या दृष्टीने विचार करायला लागते ....कमिशनर सिकिच्या वर्गात असेल कां? बालमित्र? आधीचे खून दोघांनी मिळून केले असतील कां? की आत्ताचे खून अरुण माधुरीच्या मार्गदर्शनाखाली करतो आहे? तो तिचा नवरा आहे की काय? ह्या दोघांचं लफडं आहे कां? कित्ती कित्ती विचार ते!सिरीयल किलर ' अरुण ' म्हणाल्यानंतर अरुण दचकला नाही एवढी मी दचकले. सिकि ' अरुण ' कां म्हणते हा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम ठेवला आहे. कदाचित त्यासाठी दुसरा सिझन काढायचा बेत असेल .
सिकि ' माधुरी दीक्षित ' आहे हे शेवट पर्यंत विसरत नाही. काय तो आत्मविश्वास! काय तो रुबाब! काय ती स्टाईल! काय तो सन्मान! आहाहा!... पुन्हा पुन्हा आहाहा! माझी तरी तुरुंगवास भोगलेल्या सिकि बद्दल वेगळी कल्पना होती. पण संपूर्ण सिरीज मध्ये ती सिकि नाही तर ' माधुरी दीक्षित ' च आहे. सिरीज मधील इतर कलाकार पण ती गुन्हेगार नाही तर The Madhuri आहे हे कधीच विसरत नाहीत.
मला वाटतं reality shows ची जज.. आणि बरंच काही केल्या नंतर प्रकाश झोतात राहण्यासाठी माधुरीने पुन्हा अभिनय क्षेत्र निवडलं असेल. सिद्धार्थ चांदेकर एवढ्या मोठ्या वयाच्या मुलाच्या आईची भूमिका तिने स्वीकारली म्हणजे तिने वय स्वीकारलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. वयानुरूप भूमिका स्वीकारली तर होईल तिची करियर. पण ह्यासाठी तिला आधुनिक beauty treatments बंद कराव्या लागतील आणि वहिदा रेहमान सारखं नैसर्गिक म्हातारं होत जावं लागेल.
आजच तिच्या चेहऱ्यावरील स्नायू हालत नाहीत. लवकरच हेमामालिनी श्रीदेवी ह्यांच्याप्रमाणे तोंड उघडून हसणं बोलणं तिला महामुश्कील होईल. तिचं जगप्रसिद्ध हास्य तिच्या चेहऱ्यावरुन कायमचं नाहीसं होईल.
Mrs Deshpande हे मराठी नाव मला सौ शशी देवधर सारखं वाटलं. शिवाय माधुरी खूप वर्षांनी अभिनयात .. म्हणून मी ही वेब सिरीज पाहिली. सहा भाग आहेत. पहिले तीन कंटाळवाणे आहेत. पुढील तीन भागात काय ते सस्पेन्स वगैरे भराभर कोंबलं आहे . अनेक शस्त्रक्रिया करुन पुरुषाची स्त्री होणं भारतात अत्यंत गरीब माणसाला पण शक्य आहे फक्त एखादा कॅन्सर सारखा मोठा खर्चिक आजार झाला तर गरीबालाच काय मध्यमवर्गीयाला पण पैशा अभावी मरावंच लागेल की काय हे पुढच्या सिझन साठी राखून ठेवलं आहे .
खूप दिवसांत विनोदी वेब सिरीज पाहिली नसेल, भरपूर रिकामा वेळ असेल तर रोस्टिंग साठी ही अवश्य पहा
.#सतिश साबळे
