जेंव्हा कायद्याचे 'रक्षक' च बनतात 'भक्षक'.
पत्नी व तिच्या प्रियकराने केला रिक्षाचालकाचा खून, दोन्ही आरोपी पोलीस कर्मचारी.

पालघर : रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे आरोपी पत्नी आणि प्रियकर हे दोघंही पोलीस कॉन्स्टेबल असल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी पोलीसांनी ५ जणाांना अटक केली आहे.
आरोपी पोलीस कॉन्स्टेबल विकास पष्टे आणि आरोपी महिला कॉन्स्टेबल हे दोघंही वसई पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. विकास पष्टे आणि पुंडलिक पाटील याची पत्नी या दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध असल्याचा दावा केला जातो.
विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या रिक्षाचालक पतीचा दोघांनी काटा काढला. याप्रकरणी पत्नी आणि प्रियकर विकास पष्टे यांच्यासह एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
काय आहे हे संपुर्ण प्रकरण
रिक्षाचालक पुंडलिक पाटील यांची 18 फेब्रुवारी रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मनोर ढेकाळे परिसरात रिक्षामध्येच पुंडलिक पाटील यांचा मृतदेह आढळला होता. रिक्षातच चालकाचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मनोर पोलिसांनी तपास करत अवघ्या काही दिवसात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.