गोर-गरीब जनतेचे पाणी पुढारी व धनदांडग्यांच्या घशात!. 'हर घर जल जीवन' मिशन चे निघतायेत धिंडवडे!. हातपंपावर वीज मोटारीने पाण्याची चोरी!
तालुक्यातील सर्व गावातील हातपंपावरील वीज मोटारी न निघाल्यास महाराष्ट्र सोशल मिडीयाचे तीव्र आंदोलन. - महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा शितलताई साबळे
इंदापूर : मागील १५ दिवसात ज्या तालुक्यात सत्ताधारी व विरोधक एकमेकांसमोर पाण्याच्या श्रेयासाठी शड्डू ठोकुन उभे होते आज त्याच तालुक्यातील गोरगरीब जनता जी हातपंपाच्या पाण्यावर आपली तहान भागवत आहे त्याच जनतेच्या हातपंपावर स्थानिक पुढारी व धनदांडगे लोक वीज मोटारी बसवुन त्यांच्या तोंडाच पाणी पळवित आहे.
इंदापूर तालुक्यात मागील १५ दिवसात सध्याचे आमदार व माजी आमदार यांच्यात 'हर घर जल जीवन' मिशन पाण्याच्या श्रेयवादावरून राजकारण ढवळून निघाले होते. आज त्याच तालुक्यात गाव गावात असणारे हातपंपावर वीज मोटारी लावत पाणी उपसा केला जात आहे. एकीकडे तालुक्यातील पाणी दुष्काळ आम्ही हटवला असे श्रेय घेणारे आजी-माजी पुढारी आहेत तर एकीकडे जे पाणी पट्टी भरू शकत नाही व ज्यांची तहान शासनाच्या हातपंपावर भागात आहे अशी जनता आज शासनाच्या दुर्लक्षामुळे पाण्यासाठी वणवण फिरत आहे.
तालुक्यात ठीक-ठिकाणी हातपंप आहेत आणि आज जरी सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तालुक्यात सर्वांच्या घरी 'हर घर जल जीवन' अंतर्गत पाणी पोहचत असले तरी एक वर्ग असा आहे जो याची पाणी पट्टीही भरू शकत नाही तो हातपंपाच्या पाण्यावर विसंबुन आहे. पण त्याच हातपंपावर आज ठीक ठिकाणी वीज मोटारी टाकुन त्यांची पाण्यासाठी अडवणूक केली जात आहे .
तरी शासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पण शासन स्तरावर म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसून येत नाही. या संदर्भात इंदापूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी मा. विजयकुमार परीट यांना संपर्क केला असता ते म्हणतात पुरावे द्या लगेच कार्यवाही करतो. पण आपल्या मराठीत एक म्हण आहे 'हातच्या कंकणालाआरसा कशाला' पण आपल्या प्रशासनाला याचाही विसर पडलेला दिसत आहे.
जर या वरती त्वरित काही कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्र सोशल मिडीया यावरती तीव्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली उभे करेल असा इशारा महाराष्ट्र सोशल मिडीयाच्या महिला आघाडी पुणे जिल्हाध्यक्षा शितलताई साबळे, प्रदीप साबळे यांनी दिला आहे.