चित्रपसृष्टी ही कुणाची "नशा"..तर.. कुणाची "शान" वाढवते...तर कुणाचा जीवनाचा "नाश" सुद्धा करते....न आणि श अक्षरं दोनच....फक्त एक काना योग्य ठिकाणी लागला पाहिजे....!! सतिश(भाऊ)साबळे
चित्रपट निर्माण करणे किंवा चित्रपट क्षेत्रात काम करणे हे कोणत्याही नशेपेक्षा कमी नाही...
ईथे जो एकदा आला, त्याची या क्षेत्राची नशा उतरवणे खूप अवघड. बरं हे व्यसन कोणत्याही वयात लागु शकते.. अगदी समज नसलेल्या लहान मुलांपासून ते ज्याची लाकडं स्मशानात पोहोचली आहेत अश्या म्हातार्यांपर्यंत कोणीही याचे शिकार होवु शकतात. बर्याचदा नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे आईवडील सुद्धा त्या बाळासाठी या व्यसनाच्या आहारी जातात.
कोणत्याही व्यसनाने जसे लोकांचे घरदार उध्वस्त होण्याची वेळ येते, अनेकदा तशीच परिस्थीती या क्षेत्रात काम करणार्या लोकांवर सुद्धा येते.
योग्य ते मानधन अनेकांना मिळत नाही, किंबहुना अनेक वेळा काहीही मानधन न घेता काम करावे लागते आणि या कामाचं व्यसन असलेला माणुस त्या कामासाठी सुद्धा तयार असतो.
टीव्ही वर किंवा पडद्यावर काही सेकंद जरी दिसला तरी त्याला अमाप आनंद होत असतो. तो त्याच्या संपूर्ण नातेवाईक आणि मित्र मंडळींना त्याचे काही सेकंदाचे "काम" पाहण्याचा आग्रह करतो.
अनेकदा "junior" म्हणुन काम करणाऱ्यांना चित्रीकरणा दरम्यान योग्य वागणूक सुद्धा मिळत नाही पण तरीही काही सेकंद पडद्यावर दिसण्यासाठी हे लोक धडपड करत असतात.
वर्षानुवर्ष खिजत राहतात, फुकट काम करत राहतात.. पण हे व्यसन काही केल्या सुटत नाही. आपल्या छोट्या मोठ्या गरजांसाठी इतरांकडे हात पसरवण्याची वेळ येते, तरीही हे व्यसन सुटत नाही.
हजारात किंवा लाखात म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, एखादा या क्षेत्रात यशस्वी होतो किंवा कायम काम मिळवत राहतो. आणि त्या एकाच्या मागे उरलेले सर्व आपले नशीब आजमवण्याचा प्रयत्न करत असतात.
लेखक, दिग्दर्शक, कलाकार बनायची ईच्छा बाळगणारा प्रत्येक जण या व्यसनाच्या आहारी गेलेला आहे असे म्हणायला हरकत नाही.
अर्थात हे व्यसन करायला हरकत अजिबातच नाही... कारण जर का तुम्हाला तुमच्या 99% योग्य मेहनतीला 1% नशिबाची साथ मिळाली तर या क्षेत्रात उज्वल भवितव्य आणि पैसा सुद्धा नक्कीच आहे... पण यशस्वी झालात तरीही तुमची रोज नव्याने परीक्षा आहे, रोज मेहनत करायचीच आहे, रोज स्वप्न पहायचेच आहेत, आणि रोज तुमच्या मेहनतीला योग्य न्याय मिळेल या आशेने नशिबाला आजमावून पहायचेच आहे...