काँग्रेसच्या किसान काँग्रेस प्रदेश सरचिटणीस पदी तानाजी भोंग यांची नियुक्ती
इंदापूर : सुरेश मिसाळ
सर्वसामान्य कुटुंबातील काँग्रेसचे कार्यकर्ते तानाजी भोंग यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या किसान काँग्रेस सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व भारतीय किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते तानाजी भोंग यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस विजयसिंह चौधरी, तसेच तालुका काँग्रेसचे सरचिटणीस राहुल आचरे,संतोष शेंडे, युवकचे अरुण राऊत, विद्यार्थीचे अभिजीत गोरे आदी उपस्थित होते. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उपाध्यक्ष मोहन जोशी, राज्यमंत्री विश्वजीत कदम व जिल्हाध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गोरगरीब, शेतकरी, कामगार वर्गासाठी किसान काँग्रेसच्या माध्यमातून काम करणार असल्याचे तानाजी भोंग यांनी सांगितले.
भाजपच्या केंद्र सरकारने हुकूमशाही पद्धतीने जनतेवर लादलेल्या काळया कृषी कायद्याविरोधात आंदोलन उभारून जनतेत जागृती करुन कृषी कायद्याविरोधात किसान काँग्रेसच्या माध्यमातून लढा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले. इंदापूर तालुक्यातील भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी कृषी कायद्याला केलेला समर्थनाचा भोंग यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.
