इंदापूरात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध
इंदापूर : विशेष प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक संगमवाडी पुणे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक चिराग नगर मुंबई, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ या मातंग समाजाच्या अस्तित्व आणि अस्मितेच्या विषयाकडे जाणिवपूर्वक कानाडोळा केला आहे. अशा जातीयवादी महाविकास आघाडी सरकारचा इंदापूरात लहुजी शक्ती संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
याबाबत चे निवेदन संघटनेच्या इंदापूर तालुका पदाधिकारी व मातंग समाज बांधवांच्यावतीने इंदापूरचे तहसीलदार ठोंबरे यांना देण्यात आले. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित घटनेमध्ये सर्व जाती धर्मांना समानता दिलेली आहे. आणि आपला देश या घटनेच्या आधारावर जागतिक महासत्ता होण्याचे प्रयत्न करत आहे. परंतु याच देशामध्ये लहू फुले-शाहू-आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात राज्याचे एक जबाबदार मुख्यमंत्री असून देखील आपल्या महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पात आद्य क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे स्मारक संगमवाडी पुणे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे स्मारक चिराग नगर मुंबई, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ या मातंग समाजाच्या अस्तित्व आणि अस्मितेच्या विषयाकडे मुद्दामहुन कानाडोळा केला आहे. म्हणून आपल्या या जातीयवादी महाविकास आघाडी सरकारचा तीव्र शब्दांमध्ये जाहीर निषेध करत आहे. तसेच आपण जर जाणीवपूर्वक असेच मातंग समाजाकडे दुर्लक्ष करणार असाल तर आपल्या सरकारच्या विरोधात लहुजी शक्ती सेना या संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
यावेळी लहुजी शक्ती सेनेचे इंदापूर तालुका अध्यक्ष दत्ता जगताप , कोर कमिटी तालुका अध्यक्ष तानाजी सोनवणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम काटे, साजन ढावरे, शहराध्यक्ष आकाश अडसूळ, नरेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
