महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या बांडगूळांनो, "वंचित" चं मूल्यमापन करण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कुणी? "वंचित" च्या सोलापुर जिल्हाध्यक्षांचा खडा सवाल.

प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या बांडगूळांनो,
September 20, 2021 08:04 AM ago Solapur, Maharashtra, India

सोलापुर : प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेल्या बांडगूळांनो, तुमचा बोलविता धनी कोण आहे, हे आम्हाला चांगलं माहित आहे. आज रिपाइं आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांना दलितांचा पक्ष म्हणून संबोधताना तुम्ही तुमच्या वैचारिक आणि बौद्धिक दिवाळखोरीचं उत्तम प्रदर्शन करता, हे वेगळं सांगायला नको.

वंचित बहुजन आघाडी हा जर दलितांचा पक्ष असेल तर मग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हे मराठ्यांचे पक्ष म्हणायचे का? भाजपला ब्राम्हणांचा पक्ष म्हणायचं का? वंचित बहुजन आघाडी पक्षात सर्वच जातीधर्मातील वंचित आणि शोषित काम करत आहेत.

मुळातच हा पक्ष लहानातल्या लहान जातसमूहाला आणि सामान्यातल्या अतिसामान्य वंचिताला सत्तेचा वाटा मिळावा या उदात्त हेतूने राजकारणाच्या रणांगणात उतरलाय. वंचितचा उद्देश, पक्षाची ध्येयधोरणे अतिशय स्पष्ट असताना केवळ आणि केवळ वंचित बहुजन आघाडीचा जनमाणसांतला प्रभाव कमी करण्यासाठी प्रस्थापितांशी केलेल्या अर्थपूर्ण वाटाघाटीतून पेड न्यूज दिल्या जातात. वंचित बहुजन आघाडीनं लोकशाहीचं सामाजिकीकरण केलंय, अतिशय अभ्यासाअंती आपला अजेंडा जनतेसमोर ठेवलाय. कुठल्यातरी पक्षाच्या वळचणीला जाऊन सत्तेत सहभागी न होता स्वबळावर आणि स्वतःच्या स्वयंस्पष्ट विचारांवर वंचित बहुजन आघाडी आज काम करताना दिसते. घराणेशाही आणि नात्यागोत्याचं राजकारण करून आमदारकी, खासदारकी स्वतःच्या घरातच कशी राहिल? याची काळजी घेण्यातच प्रस्थापितांनी धन्यता मानली. परंतु प्रकाश आंबेडकरांनी सामान्य माणसाच्या मनात सत्तेचा विचार रूजवला. फुले, शाहू, आंबेडकरी विचार, बुद्धविचाराचा केवळ बुरखा पांघरून दलित मतांचा वापर करून सत्तेत जाणार्‍या प्रस्थापितांनी दलितांचा कळवळा असल्याचा आव आणू नये, कारण तुम्ही आजवर "फोडा आणि राज्य करा" याशिवाय दुसरं केलंच काय? याचंही उत्तर प्रस्थापितांनी द्यावं.

वंचित बहुजन आघाडीत सध्या मराठा, मुस्लिम, साळी, माळी, धनगर, कोळी, समाजातील वंचित तरूण मोठ्या संख्येने प्रवेश घेत आहेत, मागील आठवड्यातच उस्मानाबाद जिल्ह्यातील काही तरूणांनी प्रवेश घेतला. राहिला प्रश्न वंचितला लागलेल्या "गळतीचा" तर सत्तेची फळं तात्काळ चाखायला न मिळालेल्या सत्तालोलुप आणि लालची माणसांची वंचितला खर्‍या अर्थाने गरज नाही. २०१९च्या विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांमधून भाजपमध्ये अनेकांनी प्रवेश केला तर अनेकांनी भाजपला रामराम केला, मग ती "गळती" नव्हती का? की "एकमेकां साह्य करू, अवघे मिळूनी जनतेची फसवणूक करू" हा नारा होता. आणि आतासुद्धा राजकीय विचारधारा बासनात गुंडाळून सत्तेत आलेली ही महाविकास आघाडी नसून अव्वल बिघाडी आहे. त्या तुलनेत स्वतःची विचारधारा स्पष्ट असलेला आणि लोकशाहीचं सामाजिकीकरण करणारा एकमेव स्वाभिमानी पक्ष वंचित बहुजन आघाडी आहे.

राजकारणात भरती-ओहोटी येतच राहते, ओहोटीतून सगळा कचरा बाहेर फेकला जातो, तर भरतीमुळे पक्ष संघटन मजबूत होतं. भारतात राजकीय विचारधारा पाहून खूप मोठा मतदार वर्ग मतदान करत नाही किंवा त्यांना राजकीय विचारधारा म्हणजे काय हेच माहित नसतं. मतदान केलं जातं ते एक तर "पैसा" किंवा मग "जात" या निकषावर. भारतातल्या पक्षांना राजकीय विचारधारेच्या आधारावर विभागणं खूप कठीण काम आहे, कारण स्वतःला अनेकदा पुरोगामी म्हणवून घेणार्‍या पक्षांनी केवळ पुरोगामित्वाचा बुरखा पांघरलेला असतो, हा साळसूदपणाचा बुरखाच टराटरा फाडून टाकायला आदरणीय श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर सर्व जातीतल्या वंचितांची मोट बांधून तयार आहेत.

लोकशाहीमध्ये वैचारिक आणि राजकीय अभिसरण होणं तेवढंच गरजेचं आहे. वैचारिक मतभेदांना गटा-तटाचे राजकारण हे गोंडस नाव देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. कारण भारतीय संविधानाने लोकशाहीचा अधिकार सर्वांना समान बहाल केलाय, आणि हा अधिकार देणारेसुद्धा "आंबेडकर"च आहेत, याचा बहुधा प्रस्थापितांना विसर पडलेला असावा. आता गटा-तटाचे राजकारण असं म्हणतच असाल तर, कुठल्या राजकीय पक्षात गटा-तटाचे राजकारण नाही, हेवेदावे, रूसवेफुगवे नाहीत, सगळंच आलबेल आहे हे आधी दाखवून द्या आणि मग वंचित बहुजन आघाडीकडे बोट दाखवा.

प्रस्थापितांच्या हातातलं बाहुलं बनून जर वंचितकडे बोट दाखवण्याचा प्रयत्न कराल तर तुमचं बोट तोडून हातात द्यायची ताकत वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्यात आहे हे विसरू नका.

संबधित बातम्या