Nanpakal Nerathu Mayakkam: नान पकल नेराथू मय्यकम: माध्यान्हकालाचं स्वप्न
या चित्रपटातच एक वाक्य असं आहे: "नातेवाईक/मित्र फारतर घरापर्यंत सोबत येतील, बायको घरात येईल आणि मुलगा फारतर स्मशानापर्यंत येईल. पुढचा प्रवास मात्र एकट्यानेच करायचा असतो."
Nanpakal Nerathu Mayakkam:
नान पकल नेराथू मय्यकम:
Director: Lilo Jose Pellissory
माध्यान्हकालाचं स्वप्न
...
या चित्रपटातच एक वाक्य असं आहे:
"नातेवाईक/मित्र फारतर घरापर्यंत सोबत येतील,
बायको घरात येईल आणि
मुलगा फारतर स्मशानापर्यंत येईल.
पुढचा प्रवास मात्र एकट्यानेच करायचा असतो."
...
तुम्ही म्हणजे कोण असता नक्की?
हे शरीर?
हा आत्मा?
हे मन?
हा चेहरा?
माणूस म्हणजे आठवणी.बर्यावाईट सवयी.माणूस म्हणजे
अंगभूत कौशल्य आणि उणीवा.गुण आणि दोष.लकबी.
माणसाचं अस्तित्व कशानं घडतं?
तुमचं घर,तुमचं गाव,तुमचा देश,तुमची भाषा.तुमचे कपडे.
तुमच्या आयुष्यातली माणसं.नवरा/बायको,
मुलं,आईवडील,
भाऊबहीण,जवळचे,
दूरचे नातेवाईक, शेजारीपाजारी,
मित्रमैत्रिणी,ओळखीचे,कामावरचे सहकारी?
माणूस म्हणजे नक्की काय असतं?
...
तामिळनाडूतल्या वेलिंकणीच्या यात्रेहून केरळमधे परत येताना मल्याळी जेम्सला बसमधे झोप लागते.मधेच त्याला जाग येते आणि तो ड्रायव्हरला एका गावापाशी बस थांबवायला सांगतो.
आपलंच गाव असल्यासारखा सराईतपणे या गावात शिरतो आणि थेट एका घरात शिरतो.
या घरातला कर्ता पुरुष सुंदरम दोन वर्षांपूर्वी गायब झालाय.जेम्स सुंदरम बनून या घरात वावरतो.ओसरीत बसलेली,दिवसभर टिव्ही ऐकणारी,
डोक्याने अधू म्हातारी, आंधळी आई यालाच स्वतःचा मुलगा जेम्स समजते.पण सुंदरमची बायको,वडील,मुलगी,भाऊ आणि सगळेच गाववाले हादरून जातात.
इकडे यात्रेच्या बसमधे असलेली जेम्सची बायको,मुलगा आणि इतर नातेवाईक त्याला शोधत या घरापाशी येतात.मल्याळी जेम्स आता खडाखड तामिळ बोलतोय, या गावातला, घरातलाच असल्यासारखा सराईतपणे कामं करतोय,मोपेडवरून फिरतोय.घरातलं कुत्रंही मालक आल्याच्या आनंदात घुटमळतंय. जेम्स/सुंदरम हे घरासमोर येऊन बसलेले मल्याळी बोलणारे लोक कोण आहेत म्हणून
विचारू लागतो.
जेम्सच्या नातेवाईकांनी जाब विचारल्यावर
मला माझं घर का नाकारण्यात येतंय म्हणून कळवळतो.
सुंदरमची मुलगी जवळ येऊन बोलत का नाही म्हणून तडफडतो. आंधळ्या आईच्या मांडीवर डोकं ठेऊन मन शांत करू पाहतो.
...
या अद्भुत विचित्र कथेचं काय होतं ते चित्रपटातच पहावं.
अवघ्या चोवीस तासांचा हा खेळ चित्रपट या माध्यमाची ताकद जाणवून देणारा आहे.
माम्मूटीनं काय जबरदस्त काम केलंय.जेम्स आणि सुंदरम या दोन ट्रॅक्सवर होणारे बदल विलक्षण दाखवलेत आणि कमाल एक्स्प्रेशन्स...
सुंदरमची बायको भलती खचलेली आहे.
हे मृगजळ कुठून एकदम सामोरं आलं हे तिला समजत नाही...
जेम्सच्या बायकोविषयी तिला सहानुभूती वाटते.
बसमधले इतर नातेवाईक आणि गावातले लोक पण एकेक नमुने आहेत.
हे तामिळनाडूतलं गावं फार सुंदर दिसतं. फ्रेम आणि फ्रेम देखणी आहे. बॅकग्राऊंडवर चालणारी टिव्हीवरची जुनी तामिळ गाणी आणि प्रसंग कथेला पूरक आणि छान वाटतात.
...
चित्रपटात सुरूवातीलाच एक वाक्य येते:"तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही मृत्यू पावता आणि उठता तेव्हा तुमचा नव्याने जन्म होतो."
या वाक्याचा अर्थ हा अजबसुंदर चित्रपट पाहून मिळतो.गॅब्रिएल गार्सिया मार्क्वेझच्या पुस्तकातून उतरल्यासारखा हा मल्याळी चित्रपट आहे.
~ जुई
#CinemaGully
चित्रपट मल्याळम +तामिळ आहे आणि इंग्रजी सबटायटल्स उपलब्ध आहेत.