महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

वडीलानंतर आता लेकीच्या श्रेयवादावरून बावड्याच्या पाणी प्रश्नी भाजपा - राष्ट्रवादीत कलगीतुरा; शिळ्या कढीला ऊत आणण्याचा भाजपाकडुन प्रयत्न - राष्ट्रवादीचा जोरदार आरोप.

वडीलानंतर आता लेकीच्या श्रेयवादावरून बावड्याच्या पाणी प्रश्नी भाजपा - राष्ट्रवादीत कलगीतुरा;  शिळ्या कढीला ऊत आणण्याचा भाजपाकडुन प्रयत्न - राष्ट्रवादीचा जोरदार आरोप.
February 09, 2022 07:35 PM ago Indapur, Maharashtra, India

'खोटे बोल पण रेटून बोल' अशी सवय इंदापूर भाजपला लागली आहे हे आता इंदापूरच्या जनतेने लक्षात घेतले आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा वर जोरदार हल्लाबोल केला.

राज्य स्तरीय 'हर घर जल मिशनच्या' समितीत सदस्य पदी असलेल्या इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार भरणे मामांच्या प्रयत्नातून तालुक्यात पाणी योजना कार्यन्वित करण्यात आल्या असे असतानाही भाजपकडून या गोष्टींसाठी विनाकारण श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे असे म्हणत राष्ट्रवादीचे एक एक पदाधिकारी बावड्याच्या पाणी प्रश्नात उडी मारत आहे.

मागील दोन दिवसापासून इंदापूर तालुक्यातील राजकारण एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलयं. जसजसे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तोंडावर येतील तसतसे श्रेय वादासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असून बावडा नळपाणी पुरवठा योजनेच्या श्रेयवादावरुन सुरु झालेला हा वाद सध्या तरी थंडावताना दिसत नाही.

'हर घर जल जिवन मिशन' योजने संदर्भात बावड्याच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या अंकिता पाटील यांनी प्रयत्न करून बावड्यात पाणी योजना कार्यन्वित केल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे याला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले होते.

या योजनेवरून गेल्या मार्च महिन्यातही भाजपचे हर्षवर्धन पाटील यांच्या कडून श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळेसही इंदापूर राष्ट्रवादी कडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले व आताही त्यांच्याच लेकीकडूनही ह्याच प्रश्नावर श्रेयवादाचा प्रयत्न होताना दिसून येत असल्याचे राष्ट्रवादी चे म्हणणे आहे.

जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशनचे अध्यक्ष मा. जिल्हाधिकारी यांनी दि.15 जानेवारी 2021 च्या आदेशानुसार पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, शिरूरचे आमदार अशोक पवार, पुरंदरचे आमदार संजय जगताप, जुन्नरचे आमदार अतुल बेनके आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या सात सदस्यांचा समावेश आहे.

पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत दि.12 मार्च 2021 रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत इंदापूर तालुक्यातील 140 गावांचा पाणी पुरवठा योजनेसाठीचा आराखडा राज्यमंत्री भरणे यांनी सादर केला. या मध्ये बावडा गावाचा देखील समावेश होता. सदर आराखड्याला पालकमंत्री व समितीचे अध्यक्ष अजित पवार यांचेसह समितीकडून मंजुरी देण्यात आली होती. इंदापूर तालुक्याचा ग्रामीण पाणीपुरवठा आराखडा हा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनीच तयार केला होता. समितीने झालेल्या बैठकीत आराखड्याला मंजुरी दिली होती.

या आराखड्यामध्ये बावडा गावासाठी 2 कोटी 3 लाख 77 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यामुळे बावडा गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचेच आहे. त्यामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष ॲड. शरद जामदार व जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील यांनी केलेला दावा हा खोटा आहे. पण 'खोटे बोल पण रेटून बोल' अशी सवय इंदापूर भाजपला लागली आहे हे आता इंदापूरच्या जनतेने लक्षात घेतले आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपा वर जोरदार हल्लाबोल केला.

संबधित बातम्या