महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

'पाण्याचे' राजकारण की 'पाण्यात पहायाचे' राजकारण; आत्मचिंतन करण्याची गरज.

कोरोनासारख्या भयंकर महामारीत रस्ता रोको आंदोलने व शेतकरी मेळावा घेणे हे सरकारमधील प्रतिनिधित्व करणाऱ्यांचे अपयश - महाराष्ट्र सोशल मिडीया अध्यक्ष सतीश भाऊ साबळे
'पाण्याचे' राजकारण की 'पाण्यात पहायाचे' राजकारण; आत्मचिंतन करण्याची गरज.
May 23, 2021 12:16 PM ago Indapur, Maharashtra, India

सतीश भाऊ साबळे

इंदापुर : राज्यात कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना व कडक निर्बंध असतानाही जेथे सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीही मुभा नसताना इंदापूर तालुक्यात सरकारमधील पक्षाचे नेते व पदाधिकारी रस्ता रोको आंदोलने व मेळावे घेताना दिसून येत आहे.

इंदापूर पाणीप्रश्‍नासाठी ज्या पक्षाचे सरकार त्याच पक्षाचे कार्यकर्ते व पुढारी आंदोलन करतानाचे चित्र इंदापूर तालुक्यात दिसून येत आहे. उजनी धरणातील 5 टीएमसी पाणीप्रश्नी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया, सोलापूर जिल्ह्यातील आमदारांनी, पुढारी यांनी केलेला विरोध, इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे पुढाऱ्यांनी रस्ते आंदोलने, मेळावे इ. चा घातलेला घाट म्हणजे 'तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो' असे वाटते.

पाणी मिळावे हे काही गैर नाही पण त्यासाठी कोरोना सारख्या महामारीत रस्ते रोको आंदोलने व शेतकरी मेळावा घ्यावे लागतात तेही सरकारमधील घटक पक्षातील नेत्यांना याचे उत्तर समजत नाही. सोलापूरचे पालकमंत्री असलेले व इंदापुराचे प्रतिनिधित्व करीत असलेले राज्यमंत्री यामध्ये कुठेतरी कमी पडताना दिसत आहे.

'नेहमीच येतो पावसाळा' या उक्तीप्रमाणे नेहमीच कुठेही काही थोडंसं मनासारखं झालं नाही की रास्ता रोको व मेळावे घेतले जातात पण ते प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. यात सरकारमधील मंत्रीच विरोधीपक्षा सारखी भूमिका घेताना दिसून येते यात मात्र सामान्य जनतेचा कोणताही हिताचा विचार होताना दिसून येत नाही. ज्यावेळेस गरज पडली त्या त्या त्यावेळेस ते निर्णय घेतले जातात अन्यथा द्या योजना व प्रश्न टांगत्या तलवारीसारखे नेहमीच जनतेच्या डोक्यावर ठेवली जातात जेणेकरून पुढे निवडणुकीच्या काळात ते शस्त्र म्हणून वापरता येईल व आपला राजकीय स्वार्थ साधला जाईल. सामान्य जनता नेहमीच अश्या गोष्टींवर विश्वास ठेवते व सरकारमधील नेत्यांचे कार्यकर्ते, पुढारी आपण कसे नेत्यांच्या जवळ आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण यातून सामान्य जनतेचे नुकसान होते हे त्यांना कधीच कळत नाही आणि यातूनच सामान्य जनता या नेत्यांच्या भूलथापांना बळी पडून आपला अमूल्य असा वेळ वाया घालवत असते आणी जेंव्हा वेळ निघून जाते तेव्हा त्यांच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरत नाही.

इंदापुरातील पाणी प्रश्नावरती खूप वेळा रास्ता रोको, आंदोलन झाले असतील पण हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोणतीही उपाय योजना केली जात नाही त्यामुळे हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास सत्ताधाऱ्यांनी काय काय प्रयत्न केले हे जनतेला कळावे व अशा मेळाव्यास त्यांनी खत पाणी देऊ नये व त्यांच्या कार्यकर्त्यांना सक्त ताकीद द्यावी कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम सध्यातरी कोरोना सारख्या महामारीत घेऊ नये त्यांना पाणी प्रश्न एवढीच चिंता असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या सरकारमधील मंत्र्यांना याचा जाब विचारून तो प्रश्न लवकरात लवकर निकाली लावावा.

सरकारमधील मंत्री आणि विरोधक यांच्यात नेहमीच खडाजंगी होत असते. यात कधी विरोधक तर कधी मंत्री हे नेहमीच एकमेकांना वरती कूरघोडी करण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि यातुन कोणता फायदा होतो हे काही समजत नाही पण तरीसुद्धा हे दोघेही एकमेकांवर टीका करण्यात आणि आपला अहंकार तृप्त करण्यात धन्यता मानतात, पण सामान्य जनता हुशार आहे आणि अशा प्रकारच्या घटनेतून ती शहाणी होत आहे.

पाण्याचे राजकारण होताना सत्ताधारी पक्षातील मंत्री काय उपाययोजना करतात हे महत्वाचे आहे. पण इथे उलट दिसते सरकारच विरोधकांवर टीका करते व विरोधकांवर आरोप लावते की ते टीका करतात पण विरोधकांना टीका करण्याशिवाय कोणतेही काम नसते पण सरकार म्हणून सत्ताधाऱ्यांना भरपूर कामे असतात आणि त्यांनी ते पार पाडणे अपेक्षित असते त्यामुळे टीका करणे अपेक्षित नाह. त्यांना वाटत असेल विरोधी पक्ष जाणून-बुजून कोणताही आधार नसलेले वक्तव्य करत असतील तर त्यांनी ते स्वतःच्या हिमतीवर खोडून काढावीत त्यासाठी त्यांना कोणतेही मेळावे किंवा रस्ता रोको सारखी आंदोलने करण्याची व जनतेस वेठीस धरण्याची गरज नाही, हे त्यांना जमत नसेल तर ते प्रतिनिधित्व करण्यास लायक नाही असे समजावे त्यावर 'पाण्याचे' राजकारण करताना एकमेकांना किती 'पाण्यात पहायचे' हा सर्वात मोठा आत्मचिंतनाचा विषय आहे.

संबधित बातम्या