महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापूर च्या आखाड्यात पुन्हा रंगली नूरा कुस्ती! आखाड्यात कर्मयोगी विरुद्ध छत्रपती सहकारी कारखाना.

इंदापूर च्या आखाड्यात पुन्हा रंगली नूरा कुस्ती! आखाड्यात कर्मयोगी विरुद्ध छत्रपती सहकारी कारखाना.
8 m 23 hrs 46 min 7 sec ago Indapur, Maharashtra, India

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांची कारखाना निवडणुक न लढवण्याच्या निर्यणाबद्दल सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा रंगली. पाटील समर्थक व राष्ट्रवादीचे समर्थक यांच्यात जोरदार पोस्टरबाजी होत एकमेकांना टार्गेट केले जात होते, यात प्रामुख्याने मिसरूड न फुटलेली व स्वतःला पक्षाचे अधिकृत सोशल मिडीया कार्यकर्ते म्हणवणारी शेंबडी पोरे आघाडीवर होती व ती आपलाच पक्ष व नेता कसा चांगला हेच दाखवून देत होती. पण यात मात्र शेतकऱ्यांच्या व तालुक्याच्या प्रश्नाबद्दल कोणीही बोलायला नाही व ना कार्यकर्त्यांना व ना नेत्यांना याचं सोयरसुतक पडलेले आहे.

सतीश भाऊ साबळे (अध्यक्ष, महाराष्ट्र सोशल मिडीया, महाराष्ट्र राज्य)

इंदापूर : इंदापूरच्या राजकारणात पवार विरुद्ध पाटील नेहमीच एकमेकांविरुद्ध शडडू ठोकून उभे असतात व कुस्तीची वाट पाहतात. पण ज्यावेळेस कुस्तीची वेळ येते त्यावेळेस नेहमीच लोकांच्या पदरी निराशा येऊन अटीतटीची ही कुस्ती नुरा कुस्तीत परावर्तित होते.

यावेळी असंच झालं, सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीतुन माघार घेत पाटलांना बिनविरोध निवडून देण्याची तयारी सुरू केली. इंदापूर तालुक्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व आहे. असे असताना सध्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असले तरीही कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना एकही सक्षम उमेदवार न मिळणे ही एक लाजिरवाणी गोष्ट ठरू पाहत आहे.

सहकारी कारखान्याची निवडणूक ही शेतकर्‍यांसाठी जिव्हाळ्याची गोष्ट. कारण ऊस उत्पादनावर ग्रामीण भागातील अर्थकारण जोरात चालू असते. या अर्थकारणामध्ये त्या-त्या भागातील सहकारी साखर कारखान्यांची भूमिका महत्वपूर्ण ठरते. सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना निवडून दिले तर शेतकर्‍यांच्या हातात चार पैसे कसे वाढवून मिळतील हे त्या निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीच्या हातात असते. त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या पक्षाच्या व आवडीच्या उमेदवाराला निवडून देण्याचा निश्चय करतो.

पण जर निवडणूकच बिनविरोध होत असेल तर शेेतकर्‍यांच्या विश्‍वासाला तडा जातो. राजकीय पातळीवर याचा निर्णय होतो की निवडणूक बिनविरोध करायची की निवडणुका घ्यायच्या. अशा पद्धतीने राजकारणी आपल्या सोयीचे राजकारण करतात. त्यामुळे शेतकर्‍यांच्या वैयक्तिक मताला काडीचीही किंमत राहत नाही. त्याचा परिणाम हा होतो की, शेतकर्‍यांच्या मालाला जास्तीत जास्त किंमत कशी मिळेल, याचा कोणीही विचार करताना दिसून येत नाही.


सध्या सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका वैयक्तिक स्वरूपाच्या ठरु पाहत आहेत. इंदापूर तालुक्यात ऊस दर, दूध दर, वीज प्रश्न तसेच इतर अनेक प्रश्न आहेत. याबाबतीत ना सत्ताधारी पक्षाचे नेते बोलायला तयार आहेत, ना विरोधी पक्षाचे नेते. मात्र जेथे सोयीचे राजकारण व अर्थकारण असेल तेथे मात्र दोन्ही पक्ष (सत्ताधारी व विरोधक) एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतात व राजकीय सत्तेसाठी एकमेकांचे गळे पकडत असतात. परंतू ज्या-ज्या वेळेस सामान्य जनतेचे व शेतकर्‍यांचे प्रश्न येतात त्यावेळेस दोन्ही पक्ष मूग गिळून गप्प बसतात, हे शेतकर्‍यांना आणि साखर कारखान्याच्या शेतकरी सभासदांना कळून आले आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत कोणत्या पक्षाला निवडून द्यायचं व कोणता उमेदवार निवडून द्यायचा हे शेतकर्‍यांनी आत्ताच ठरवले आहे. नाहीतर पुन्हा शेतकर्‍यांच्या हातात फक्त उसाचा चोथाच मिळेल व त्यातील साखर ही दोन्ही पक्षातील नेत्यांच्या गळ्यात उतरेल, हेही या बळीराजाला आता चांगलेच उमजले आहे.

तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखाना व छत्रपती सहकारी साखर कारखाना हे शेतकरी, ऊस उत्पादकांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. या दोन्ही कारखान्यावर अनुक्रमे पाटील व पवार यांचे वर्चस्व आहे. म्हणजे सध्याच्या राजकीय दृष्टीने भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व. सध्या राज्यात महाविकास आघाडीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व व सत्ता आहे. पण त्यांना इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सक्षम उमेदवार न मिळणे संशयास्पद वाटते. कदाचित त्यांचे पाटील यांच्याशी साटेलोटे झाले असेल, असे म्हणण्यास वाव आहे.
छत्रपती सहकारी कारखान्याच्या बदल्यात त्यांनी कर्मयोगी ला निवडून द्यावे व कर्मयोगी ने छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होऊन द्यावी, हेच यातून त्यांना साध्य करायचे आहे असे वाटते.

यामध्ये मात्र शेतकर्‍यांच्या विकासाकडे जाणीवपूर्वक व हेतुपूर्वक दुर्लक्ष केले जाते व आपलीच पोळी कशी भाजुन निघेल, याचाच विचार राजकारण्यांकडून होतो. यामध्ये स्थानिक पुढारीही सहभागी असतात. त्यामुळे इंदापूर च्या कारखाना निवडणुकीत नेहमीच पवार विरुद्ध पाटील असा नुरा कुस्तीचा कार्यक्रम रंगलेला दिसून येतो. कारण यामध्ये त्यांचे वैयक्तिक स्वार्थ व हित लपलेले असते. यातच ते धन्यता मानतात. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते व शेतकर्‍यांना फक्त कामापुरते वापरून त्यांच्या उसाची साखर काढून शेतकर्‍यांचा हाती फक्त पाचट दिली जाते.

इंदापुरात सध्याचे सत्ताधारी आमदार व राज्यमंत्री दत्ता भरणे हे कोट्यवधींची विकास कामे केल्याचे सांगतात. पण तरीही त्यांना सक्षम उमेदवार उभा करता न येणे हे त्यांचे राजकीय अपयश आहे का? कारण पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत पक्षाने त्यांच्याकडे संपूर्ण जबाबदारी सोपवली असतानाही त्यांना त्यांच्या पक्षाचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत व त्यांना भाजपच्या समाधान आवताडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. आता सध्या येथेही त्यांना पाटलांकडून कारखान्याच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागतोय याला पाटलांची राजकीय मुत्सद्देगिरी म्हणावी की भरणे यांची राजकीय अपरिपक्वता? कारण ज्या-ज्या वेळेस निवडणूका येतात, त्या-त्या वेळेस राजकीय मुत्सद्देगिरी दाखवून देणे गरजेचे असते. पण इथे भरणे मामांना एकही सक्षम उमेदवार पाटलांच्या विरोधात उभा करता येत नाही. उमेदवारच मिळेना मग निवडणुकीत यश मिळणे तर लांबच राहिले. कारण जे स्वतः पवारांच्या जिवावर निवडुन आले आहेत, ते काय दुसर्‍यांना निवडुन आणणार?

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदिपदादा गारटकर यांनी बुधवार (दि. 23) रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले होते की, आम्ही कामगारांच्या व शेतकरी हितासाठी निवडणूक लढवू. पण गुरुवारी (दि. 24) त्यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलून आम्ही निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले. या एका दिवसात गारटकर यांनी कामगार आणि शेतकरी हिताच्या कोणत्या निर्णयामुळे निवडणुकीतून माघार घेतली, हे तालुक्यातील शेंबडे पोर ही सांगू शकेल. यातून एक तरी नक्की आहे, की कोणत्याच पक्षाला वा उमेदवाराला शेतकरी प्रश्‍नाबाबत काहीही स्वारस्य उरलेले नाही. फक्त आणि फक्त आपले राजकारण आणि आपली सत्ता कशी आबाधित राहील, याकडेच त्यांचा होरा आहे. गरीब शेतकरी आपल्या पिकाला चांगला भाव मिळेल, आपला परिवाराची गुजराण चांगली होईल, या भावनेतून शेती करतो. मात्र काही अप्पलपोटी राजकारणी आपली पोळी भाजून घेण्यासाठी या शेतकर्‍यांना फक्त आश्‍वासनांची गाजरे दाखवित, उद्याच्या उज्ज्वल भवितव्याची दिवास्वप्ने दाखवून त्यांचा वर्तमान मात्र हिरावून घेत आहेत, हे मात्र नक्की.

संबधित बातम्या