महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

तरंगवाडीत बेकायदेशीर सुरु असलेल्या 'प्रतिक स्टोन क्रशर' मुळे ग्रामस्थांच्या जीवीताला धोका.

तात्काळ क्रेशर बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी
तरंगवाडीत बेकायदेशीर सुरु असलेल्या 'प्रतिक स्टोन क्रशर' मुळे ग्रामस्थांच्या जीवीताला धोका.
March 11, 2021 12:50 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : सुरेश मिसाळ

तरंगवाडी गावात असणा-या विनापरवाना खडी क्रेशर मुळे उभ्या फळ, भाजीपाला पिकांचे लाखों रूपयांचे नुकसान होत आहे. खाणीपासून शंभर फुटांवर असणा-या जिलेटीनच्या गोडावूनला दुर्देवाने आग लागल्यास नागरीकांच्या जीवीतास धोका होवू शकतो. खाणीसाठी होणा-या ब्लास्टींगमुळे मनुष्यहानी होण्याचा धोका निर्माण झाला असून हा विनापरवाना मनगटशाहीच्या जोरावर चालू असणारा प्रतिक स्टोन क्रशर तात्काळ कायमस्वरूपी बंद करण्यात यावा, अशी मागणी तरंगवाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

सदर निवेदनात म्हटले आहे की, तरंगवाडी ग्रामपंचायत हद्दीत प्रल्हाद निवृत्ती देवकाते यांचे प्रतिक स्टोन क्रेशर नावाचे खडी क्रेशर आहे. हे खडी क्रेशर गावाच्या अवघ्या पाचशे मीटर अंतरावर आहे. ग्रामस्थांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर रस्त्याच्या कडेला ४० ते ५० फुट खोल खाण असून त्या खाणीचे बेकायदेशीररित्या काम सुरु आहे. याठिकाणावरुन दररोज ग्रामस्थांना, लहान मुलांना तसेच जनावरे यांना या खाणीपासून जीव मुठीत धरुन ये-जा करावी लागत आहे.

या ठिकाणी खाणीचे काम करत असताना ब्लास्टिंग उडविण्यात येत आहेत. या खाणी जवळ १०० फुट अंतरावरच गोविंद जेगेटिया (राजस्थानवाले) यांचे जिलेटिनचे गोडावून आहे. जर समजा दुर्देवाने या गोडावूनला आग लागल्यास जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जीवीतहानी होवून भविष्यात मोठी मनुष्यहानी होण्याचाही धोका असल्याने प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. त्याचप्रमाणे या खडीक्रेशरच्या धूळीमुळे आसपासच्या शेतकर्‍यांच्या २० ते ३० एकर बागायत क्षेत्राला फटका बसत आहे.

यात डाळींब, द्राक्षे, ऊस, मका तसेच तरकारी पिकांना फटका बसून शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. तसेच खडीक्रेशर वरुन माल घेवून भरधाव वेगाने गावातून जात असलेल्या वाहनांमुळे घराजवळ, गावात खेळत असलेल्या लहान मुलांना यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे.

या वाहनचालकांना याबाबत विचारणा केल्यास गावकऱ्यांना दमदाटी केल्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ या विनापरवाना सुरु असलेल्या खडी क्रेशरवर कायदेशीर कारवाई करुन खडी क्रेशर बंद करावा, अशी मागणी गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

यावेळी तुकाराम करे, महादेव वाघमोडे, अजिनाथ तरंगे, कांतीलाल तरंगे, सुहास बुटे, शिवराज गावडे, राजू भिसे, अण्णा तरंगे, दीपक डोंबाळे, अमोल डोंबाळे, बापू तरंगे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

संबधित बातम्या