महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

इंदापुरचा वाद बारामतीच्या दरबारी; इंदापूरचे शेतकरी आंदोलक ताब्यात.

इंदापुरचा वाद बारामतीच्या दरबारी; इंदापूरचे शेतकरी आंदोलक ताब्यात.
May 26, 2021 12:56 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापुरच्या शेतकऱ्यांनी उजनी धरणासाठी आपले बलिदान दिले असून आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालेच पाहिजे अशी भूमिका इंदापुरच्या शेतकऱ्यांनी घेतली आहे.

बारामती - इंदापुर तालुक्यसाठी दिल्या जाणाऱ्या उजनीच्या 5 टीमसी पाण्याचा प्रश्न आता बारामतीच्या दरबारी जाऊन पोहोचला आहे. उजनी धरणाचे 5 टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील २२ (आता 22 नव्हे 59) दुष्काळग्रस्त गावांना देण्याचा निर्णय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला होता. मात्र हा पाणी प्रश्न पेटल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला. या निषेधार्थ इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या निर्णायविरोधात इंदापूरच्या काही शेतकऱ्यांनी आज शरद पवारांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तत्पूर्वीच दोन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

उजनीच्या पाण्याचा प्रश्न पेटल्यानंतर अजित पवारांनीही कोणी कोणाचे पाणी पळवणार नसल्याचे संकेत दिले होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी भरणे यांचा निर्णय रद्द केला. त्यावर इंदापूर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले, आणि आज त्यांनी दत्तात्रय भरणे यांनी घेतलेला ५ टीएमसी पाणी इंदापूरला देण्याच्या निर्णय कायम ठेवण्यात यावा अशी मागणी करत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत दोन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान पवार यांच्या निवासस्थानी गोविंदबाग येथे पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पुण्यातून १८ ते १९ टीएमसी सांडपाणी उजनी धरणात येते. या पाण्यावर प्रक्रिया करून पाच टीएमसी पाणी सणसर कट कालव्यांमधून इंदापूर तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त २२ गावांना देण्याचा निर्णय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला होता. मात्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय रद्द केला. या पाणी प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील शेतकरी सोलापूर जिल्ह्यातील राजकीय आंदोलनाला विरोध करत आहेत.

संबधित बातम्या