महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

30 वर्षाचे भिजत घोंघडे, राजकीय नेत्यांचे अपयश; उजनी पाणी प्रश्न अजूनही अनुत्तरितच.

स्वपक्षीय नेत्यांची मनधरणी करता येत नाही तेथे विरोधकांची काय करणार - महाराष्ट्र सोशल मिडीया अध्यक्ष सतीश भाऊ साबळे
30 वर्षाचे भिजत घोंघडे, राजकीय नेत्यांचे अपयश; उजनी पाणी प्रश्न अजूनही अनुत्तरितच.
May 27, 2021 02:26 PM ago Indapur, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडीया अध्यक्ष सतीश भाऊ साबळे

इंदापुर : राज्यात तीस वर्षात अनेक सरकारं आली अन् गेली, बरेच जण खासदार, आमदार आणि मंत्री म्हणून मिरवून गेले. पण इंदापूर तालुक्यातील निरा डावा कालव्यावरील २२ गावांमधील दोन पिढ्यांच्या पदरी संघर्षानंतरही बारमाही पाणी प्रश्नांबाबत लढा देवूनही प्रतीक्षाच आली आहे. गेल्या ३० वर्षांपासून धगधगत असलेल्या या पाणीप्रश्नाला राजकीय पक्षांनी वेगळा रंग दिल्याने या पाणीप्रश्नाचे भिजत घोंगडे कायम राहिले आहे.

निरा डावा कालव्यावरील अंथुर्णे पासुन शेटफळहवेली पर्यंत बावीस गावांच्या शेती सिंचनाचा कायमचा प्रश्न सोडवण्यासाठी खडकवासला कालव्यावर सणसर जोड बोगदा तयार करण्यात आला. यामधुन निरा डावा कालव्यामध्ये पाणी आणून चारी क्रमांक ४६ ते ५९ मध्ये पाणी आवर्तन देऊन हा बारमाही भाग बागायती करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार निमगाव-केतकी येथे येवून शेतकरी मेळाव्यात प्रचंड जनसमुदाया समोर जाहीर सभेत केली. शेतकऱ्यांना ऊसाची लागण करावी १२ महिन्याला १२ पाळ्या मिळतील, असे आश्वासन दिले गेले.

परंतु, आज तब्बल ३० वर्ष पुर्ण झाली. तरी २२ गावातील पाणी प्रश्न सुटलेला नाही. १९९५ मध्ये युतीचे शासन सरकार आले. त्यावेळी तत्कालीन मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी १९९७ मध्ये धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध असल्यास २२ गावांतील खातेदारांना एकरी १५ गुंठे असे सुमारे १२५० एकर क्षेत्रास ७ नंबर अर्जावर पाणी परवानगी बारमाही देण्यास मंजुरी दिली. विधान परिषद समिती सदस्यांच्या पाहणी नंतर कायम स्वरूपी योजना मंजुर करावी, अशी शिफारस झाली. त्यामुळे एकरी १५ गुंठ्याएवजी २० गुंठ्याला ७ नंबर फॉर्मवर पाणी देण्यास मंजुरी आली.

आता राज्याचे विद्यमान राज्यमंत्री दत्तामामा भरणे यांनी या प्रश्नासाठी गाजावाजा करून उजनी धरणावरुन ५ टीएमसी पाणी मंजुर केले. मात्र सोलापुर मधील स्वपक्षीय आमदारांच्या दबावामुळे एक महिना होण्याच्या अगोदरच आदेश रद्द करण्यात आला. त्यामुळे हा प्रश्न भिजत राहणार आहे. या गावातील शेतकऱ्यांना कायम स्वरूपी बारमाही पाण्याबाबत प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

तालुक्यातील अंथुर्णे भरणेवाडी शेळगाव निमसाखर, रेडणी, निमगांव-केतकी, गोतंडी दगडवाडी, घोरपडवाडी, सराफवाडी, निरवांगी, रेडा,रेडणी, काटी, लाखेवाडी, खोरोची, भोडणी या गावांतील शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांनी यासाठी संघर्ष केला आहे. मुळच्या अध्यादेशाप्रमाणे ३.९ टीएमसी हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

खासदार सुप्रिया सुळे या लोकसभेला प्रथमच उभ्या राहिल्यानंतर २२ गावांतील शेतकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेऊन निमगांव-केतकी येथे हक्काच्या बारमाही पाण्यासाठी काही दिवस उपोषण देखील केले होते. मात्र, आश्वासित केल्याने विरोध मावळला. परंतू, अद्यापही हा प्रश्न सोडवण्यात खासदारांनी ताकद दिली नाही. तसेच सध्या ५ टीएमसी पाणी वादात पक्षासाठी सोयीची भुमिका घेतली असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.

खडकवासला कालव्यावरुन निरा डावा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सुरवातीला कडबनवाडी येथे सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र, काही राजकारण्यांच्या दबावामुळे सणसरला जोड बोगदा जोडण्यात आला. त्यावेळेपासुन राजकारणाच्या कात्रीत सापडलेला हा बोगदा या भागाला शापित ठरला आहे.

संबधित बातम्या